अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय
![The Supreme Court is ready to hear the petitions of 10th and 12th class students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court-1.jpg)
नवी दिल्ली – विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. कारण यासंदर्भात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज आपला निकाल देणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ याबाबत आपला निकाल देईल. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. त्याविरोधात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.
महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या वतीनं त्याविरोधात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारनं आधीच परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केलेला होता. त्यामुळे हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनलेलं आहे. महाराष्टासह दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा या सरकारांनीही कोर्टात यूजीसीच्या गाईडलाईन्सला विरोध केला आहे.
राज्य सरकारची भूमिका काय?
राज्यातील 14 सार्वजनिक विद्यापीठात आत्ता 7 लाख 34 हजार 516 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणारे यात 2 लाख 83 हजार 937 विद्यार्थी आहेत. राज्य सरकारनं पदवीच्या मुलांच्या परीक्षा होणार नाहीत, असं म्हटलंय पण यूजीसी परीक्षांवर ठाम आहे. 30 सप्टेबरच्या आत परीक्षा घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचनाही यूजीसीनं दिल्या आहेत. त्याविरोधात महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी, न्या. एम.आर.शाह आज यावर आपला फैसला सुनावणार आहेत