अंगावर जंतूनाशक फवारा मारण्यावर आणणार बंदी! केंद्र सरकार लवकरच काढणार अधिसूचना
नवी दिल्ली – देशभरात बऱ्याच ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण कक्षात अंगावर जंतूनाशकांचा फवारा मारला जातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकार त्यावर लवकरच बंदी आणणार आहे. सुप्रीम कोर्टाला काल सोमवारी ही माहिती देत सरकार म्हणाले की, याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.
गुरसिमरनसिंह नरूला यांनी सुप्रीम कोर्टात पीआयएल दाखल करून कर डिसइन्फेक्शन टनेलवर बंदीची मागणी केली होती. सोमवारी सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, विमानतळ, रेल्वेस्थानके, शॉपिंग मॉल व इतर जागी सॅनिटायझर व जंतूनाशकांचा फवारा मारल्याने लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते असे विविध आरोग्य संस्थांच्या संशोधनात आढळले आहे. लवकरच केंद्र सरकार संबंधित संस्थांना अधिसूचना जारी करून अशा निर्जंतुकीकरण कक्षांचा वापर करणे थांबवण्यास सांगणार आहे.