breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

तलवारबाजीमध्ये देखील एक रौप्य व २ कांस्यपदके : दिवसभरात २ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई

चेन्नई : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचा आजचा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. आज ज्युदो, तलवारबाजी आणि कबड्डी या तीन खेळ प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली. ज्युदोमध्ये १ रौप्य, २ कांस्य, तलवारबाजीमध्ये १ रौप्य व २ कांस्य तर कबड्डीमध्ये मुलांनी कांस्य पदकाची कमाई केली.

ज्युदोच्या ५५ किलो गटात महाराष्ट्राच्या मोहीत मौल्या याला अंतिम फेरीत पंजाबच्या शिवांश वशिष्ठचे आव्हान होते. मोहितच्या तुलनेत शिवांश वशिष्ठ उंच असल्याने, त्याला याचा फायदा अंतिम लढतीत झाला. मात्र मोहितने देखील चांगली झुंज दिली. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडू गुण मिळवू शकले नाहीत. तेव्हा लढत गोल्डन स्कोअरमध्ये (सडनडेथ) गेली. यावेळी शिवांश वशिष्ठने एका गुणाची कमाई करताना सुवर्ण पदक कमावले. मोहित हा ठाणे शहरात मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. मोहितने राज्य स्तरावर आणि सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन पदके जिंकली आहेत.

पुण्याच्या ओमने जिंकले कांस्यपदक, दिवंगत वडिलांना अर्पित केले पदक

ज्युदो मध्ये ५५ किलो गटात पुण्याच्या ओम हिमगिरेने कडवी झुंज देताना पदार्पणातच कांस्य पदक जिंकले. त्याने हरयाणाच्या बाबूराम याला पराभूत करताना ही कामगिरी केली. निर्धारित चार मिनिटात बरोबरी झाल्यानंतर गोल्डन स्कोअरमध्ये विजय संपादन करीत महाराष्ट्राला ज्युदो मध्ये दुसरे पदक मिळवून दिले.

पुण्याच्या इंदापूरमधील पुलगाव येथील ओम हा गोव्यातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र येथे सुशील गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली सराव करतो. सहा वर्षापूर्वी त्याचे वडिल समीर हिमगिरे यांचे निधन झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खेलो इंडियातील जिंकलेले पदक ओमने दिवंगत वडिलांना अर्पित केले. पदक जिंकल्यांनंतर ओम म्हणाला की, ‘मी पदक जिंकावे ही वडिलांचे स्वप्न चेन्नईतील पूर्ण झाल्याचे मोठे समाधान आहे.’

मुलींच्या ४८ किलो गटात ठाण्याच्या भक्ती भोसलेंने पदार्पणातच कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत चिवट झुंज देत भक्तीने पश्चिम बंगालच्या ऐश्वर्या रॉयला पराभूत केले. सतरा वर्षीय भक्ती ही तिचे वडिल मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

हेही वाचा –  प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारीचाच दिवस का? जाणून घ्या या दिवसाचे विशेष महत्व

तलवारबाजीत महाराष्ट्राला तीन पदके

तलवारबाजी मध्ये तेजस पाटील याने रौप्यपदक पटकावले तर रोहन शहा व शिरीष अनगळ यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकले. फॉईल या क्रीडा प्रकारामध्येच रोहन याने या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले असले तरी त्याने दाखवलेले कौशल्य खूपच कौतुकास्पद होते. तेजस व रोहन या दोन्ही खेळाडूंनी आजपर्यंत अखिल भारतीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. तेजस व रोहन हे दोघेही संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमी मध्ये एम. तुकाराम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. सॅब्रे प्रकारात शिरीष याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तो सांगली येथील खेळाडू असून त्याला सुरेंद्र यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कबड्डीमध्ये मुलांना कांस्य पदक

कबड्डीमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे महाराष्ट्राच्या मुलांचे स्वप्न आज उपांत्य फेरीतील पराभवामुळे संपुष्टात्त आले. एकतर्फी झालेल्या उपांत्य लढतीत बलाढ्य हरयाणा संघाने ४५-२८ महाराष्ट्रावर असा सफाईदार विजय नोंदविला. या पराभवामुळे महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतवेळीही महाराष्ट्राला मुलांच्या गटात कांस्यपदक मिळाले होते.

हरयाणाने सुरुवातीपासूनच जोरदार चढाया व भक्कम पकडी याच्या जोरावर वर्चस्व गाजविले. पूर्वार्धातच दोन वेळा लोण चढवीत त्यांनी मध्यंतराला २४-७ अशी मोठी आघाडी घेतली होती. ही आघाडी पार करण्यात महाराष्ट्राला अपयश आले. मध्यंतरानंतर हरयाणा संघाने आणखी एक लोण नोंदवित आपली बाजू आणखी भक्कम केली. हरयाणाच्या अंकित कुमार व दीपक कुमार यांनी पल्लेदार चढाया केल्या तर प्रियांशु कुमार त्याने उत्कृष्ट पकडी केल्या. महाराष्ट्राकडून सौरभ राठोड, अनुज गावडे व वरूण खंडाळे यांनी चांगली लढत दिली.

स्क्वॅशमध्ये महाराष्ट्राला निरुपमाकडून पदकाची आशा

महाराष्ट्राच्या निरुपमा दुबेने दमदार कामगिरी बजावताना उत्तर प्रदेशाच्या उन्नती त्रिपाठीला ३-२ असे पराभूत करताना स्क्वॅशच्या वैयक्तिक प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेहरू पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, चेन्नई येथे सुरु असलेल्या स्पर्धेत ठाण्याच्या निरुपमा दुबेने धडाकेबाज कामगिरी बजावताना दिल्लीच्या प्रेरणा शर्माला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. निरुपमा समोर उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या समरिन रिजचे आव्हान असणार आहे. सिद्धांत महाविद्यालय, बदलापूर ठाणे येथे निरुपमा दुबे शिकत आहे.

बॉक्सिंगमध्ये शाश्वत तिवारी, देविका सत्यजित, प्रियानी शिर्के उपांत्य फेरीत दाखल

महाराष्ट्राच्या शाश्वत तिवारीने तेलंगणाच्या सलमान राजला पराभूत करून ५४-५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मुलींच्या गटात देखील महाराष्ट्राच्या मुलीनी चमकदार कामगिरी बजावताना ३ मुलीनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. ५०-५२ वजनी गटातून देविका सत्यजितने पश्चिम बंगलच्या त्रिलेखा गुरांगला पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. ५२-५४ किलो वजनी गटात प्रियानी शिर्केने उत्तराखंडच्या भूमिका महरला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. मात्र, ४८-५० किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या खुशी जाधवला हिमाचल प्रदेशच्या कशिशकडून तर ५४-५७ किलो गटात स्वप्ना चव्हाणला मध्यप्रदेशच्या अंजली सिंगकडून पराभव स्वीकारावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button