breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ब्राह्मण असल्याचा अचानक न्यूनगंड का वाटावा? ठाकरे गटाचा फडणवीसांना सवाल

मुंबई : मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ब्राह्मण असल्याचा अचानक न्यूनगंड का वाटावा? असा सवाल उपस्थित केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

फडणवीस यांच्यावर टीका केली की ते सांगतात, मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केले जाते. स्वतः ब्राह्मण असल्याचा असा अचानक न्यूनगंड त्यांना का वाटावा? पेशव्यांच्या राघो भरारीबद्दल समस्त मराठ्यांना अभिमान आहे. चापेकर बंधू, टिळक, वीर सावरकर, क्रांतिवीर फडके यांच्या शौर्याच्या आड ब्राह्मणत्व आले नाही. न्यायप्रिय रामशास्त्री हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. नितीन गडकरी यांच्याविषयी कोणी चुकीची भाषा वापरत नाही. मुख्य म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिली दोनेक वर्षे महाराष्ट्राने त्यांना डोक्यावरच घेतले होते. फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते मुख्यमंत्री नकोत, असा पवित्रा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने कधीच घेतला नाही व फडणवीस यांच्या विरोधात कोणी आंदोलन केले नाही. मोदींच्या मनात आले म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. यापेक्षा तेव्हा त्यांची कर्तबगारी नव्हती.

फडणवीस यांनी त्यांच्या पोटातले कारस्थानी दात बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्याविषयी रोष निर्माण होऊ लागला. फडणवीस यांनी स्वतःच आपले नेतृत्व आणि प्रतिमा नष्ट केली आहे. महाराष्ट्राने अंतुले यांच्या रूपाने मुसलमान, सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने कर्तबगार दलित मुख्यमंत्री स्वीकारला व मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ब्राह्मण होते. महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र कर्तबगारी व शौर्याला मानतो. ढोंग व कारस्थानाचा तिरस्कार करतो. सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरू आहे व त्याची सुरुवात महाराष्ट्रात फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून झाली.

हेही वाचा – जरांगे-पाटील तब्येत जपा…काळजी घ्या, तुमची समाजाला गरज : माजी आमदार विलास लांडे

मोदी-शहांची पावले ही सुडाच्या राजकारणाची पावले आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे असे विषारी वातावरण कधीच नव्हते. जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला, हवेत गोळ्या चालविल्या व त्यातून आजचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले, पण गृहमंत्री फडणवीस म्हणतात, मराठा आंदोलकांवर लाठीमार केला हे मला माहीत नाही. गृहमंत्र्यांना विचारून कोणी लाठीमार करतो काय? असा प्रश्न ते विचारतात. राजकीय विरोधकांच्या बाबतीत कोणत्या भूमिका घ्यायच्या, कोणाला अडकवायचे, कोणत्या भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट द्यायची, कोणाचे गुन्हे मागे घ्यायचे, कोणाच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावायचा, हे सर्व गृहमंत्र्यांना विचारून करणारे पोलीस इतक्या मोठ्या मराठा आंदोलकांवर लाठ्या चालवताना गृहमंत्र्यांना विचारीत नाहीत, हे फडणवीसांचे म्हणणे खरे मानले तर महाराष्ट्रातील सकल मराठा आंदोलकांना ते काडीचीही किंमत देत नाहीत हाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ होतो.

सरकार मराठा आंदोलन व आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नाही. सरकारला हे आंदोलन चिघळवून भडका उडालेला हवा आहे. सरकारला भीमा-कोरेगावप्रमाणे पेटवापेटवी व्हावी असे वाटते आहे. फडणवीस-मोदी-शहा हे अपात्रतेनंतरही शिंदे यांना ‘टिकविण्याचा’ तोडगा शोधून बसले, पण मराठ्यांच्या आरक्षणावर त्यांना तोडगा काढता येत नाही. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात बसवून दिल्लीस न्यावे व मोदींच्या समोर बसवावे. मोदी हे विश्वगुरू आहेत. जागतिक प्रश्नांवर ते तोडगे काढतात. त्यामुळे संसदेचे विशेष सत्र बोलावून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे त्यांना कठीण नाही. मिंधे-पवार मराठा आहेत. फडणवीस ब्राह्मण आहेत. येथे तुमच्या जाती-पोटजातीचा प्रश्न येतोच कोठे? सत्ता भोगताना, महाराष्ट्र ओरबाडताना ‘जाती’ आठवल्या नाहीत, मग आताच का आठवतात? बेकायदेशीर मुख्यमंत्री शिंदे यांना टिकवण्याचा तोडगा आहे, पण जरांगे-पाटील यांचे प्राण वाचविण्याचा तोडगा नागपूरच्या कोतवालाकडे नाही. उगाच ब्राह्मणांना का बदनाम करता? असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button