breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : हैदराबादचा शानदार विजय; बंगळुरूचं प्ले-ऑफ्सचं गणित अवघड

शारजाह – विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज विजय मिळवून सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या हंगामातील आपले आव्हान कायम राखले आहे. बंगळुरूने हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान हैदराबादने 5 विकेट गमावून 14.1 षटकांत पूर्ण केले. या विजयासह हैदराबादने प्ले-ऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले. तर या पराभवामुळे बंगळुरूला आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकणे अपरिहार्य असणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांपुढे बंगळुरुच्या फंलदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. बंगळुरूने 20 षटकांत 7 विकेट गमावून 120 धावा केल्या. हैदराबादने बंगळुरुला ठराविक अंतराने धक्के दिले. तिसर्‍याच षटकात 13 धावसंख्या असताना सलामीवीर देवदत्त पड्डीकल 8 चेंडूत 5 धावांवर बाद झाला. त्याला संदीप शर्माने बोल्ड केले. यानंतर कर्णधार विराट कोहलीही पाचव्या षटकात अवघ्या 7 धावा करून परतला. तोही संदीप शर्माची शिकार झाला. मग 28 धावांत 2 गडी तंबूत परतल्यानंतर जोश फिलिप आणि एबी डिव्हिलियर्सने तिसर्‍या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. मात्र डिव्हिलियर्स शाहाबाज नदीमच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर फिलिपही माघारी परतला. त्याने 31 चेंडूत 32 धावा केल्या. ठराविक अंतराने हे दोघे बाद झाल्यानंतर बंगळुरूची घसरण सुरू झाली. त्यानंतर ख्रिस मॉरिस 3 आणि इसुरु उडाना 0 धावांवर बाद झाला. मग गुरकीरत सिंग 15 धावा करून नाबाद राहिला. मात्र त्याने खूप हळू फलंदाजी केली. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून संदीप शर्माने कमालीची गोलंदाजी केली. त्याने त्याच्या चार षटकांत 20 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याशिवाय जेसन होल्डरने आपल्या कोट्याच्या चार षटकांत 27 धावा देऊन दोन बळी घेतले. त्याचबरोबर टी नटराजनने चार षटकांत केवळ 11 धावा देऊन एक गडी बाद केला.

मग बंगळुरूने दिलेल्या विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. हैदराबादला 10 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 8 धावांवर बाद झाला. यानंतर ऋद्धीमान साहा आणि मनिष पांडे या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. परंतु मनिष पांडे 26 धावांवर बाद झाला. यानंतर ऋद्धीमानने हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही 39 धावांवर बाद झाला. ऋद्धीमानने 32 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर केन विलियम्सनला विशेष काही करता आले नाही. केन 8 धावांवर बाद झाला. मग हैदराबादला विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या घाईत 8 धावांवर बाद झाला. यानंतर जेसन होल्डरने षटकार खेचत हैदराबादला विजय मिळवून दिला. होल्डरने 10 चेंडूत 1 चौकारआणि 3 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button