breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : फायनलच्या रणांगणात रोहित शर्माची अग्निपरीक्षा

IPL 2020 – मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी रविवारची आयपीएल फायनल ही खऱ्या अर्थानं मोठी कसोटी ठरावी. एक कर्णधार आणि एक फलंदाज या नात्यानं रोहितची गुणवत्ता फायनलच्या रणांगणात नक्कीच पणाला लागणार आहे. पण टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं तिकीट मिळवायचं, तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराच्या फिटनेसची दुबईत अग्निपरीक्षा आहे.

रोहितला जांघेतल्या स्नायूंच्या दुखापतीमुळं 18 ऑक्टोबरपासून आयपीएलच्या सलग चार सामन्यांमध्ये सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. बीसीसीआयचे फिजियो नितीन पटेल यांनी खरं तर त्याला तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी20 संघांमधून रोहितला वगळण्यात आलं. तसंच त्याच्या अनुपस्थितीत वन डे आणि ट्वेन्टी20 संघांच्या कर्णधारपदी लोकश राहुलची निवड करण्यात आली.

इथंच माशी शिंकली आणि रोहितनं केवळ दोन आठवड्यांचीच विश्रांती घेऊन आयपीएलच्या रणांगणात पुनरागमन केलं. त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या क्वालिफायर वन सामन्यात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळल्यानंतर रोहितनं आपण दुखापतीतून सावरलो असल्याचं जाहीर केलं. पण निव्वळ या दोन सामन्यांमधली कामगिरी लक्षात घेऊन रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट झाला आहे, असं मानता येईल का?

जाणकारांच्या मते, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. रोहित शर्मा लागोपाठ दोन आयपीएल सामन्यांत खेळला हे वास्तव असलं तरी या दोन्ही सामन्यांमध्ये त्यानं असामान्य असं काहीच करून दाखवलेलं नाही, हेही तितकंच खरंय. तुम्हीच बघा… रोहितनं हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सात चेंडूंत चार धावांची खेळी केली. त्यानं चार चेंडूंवर एकेक धाव घेऊन या चार धावा जमवल्या. मग दिल्ली कॅपिटल्सच्या रवीचंद्रन अश्विननं त्याला भोपळाही फोडू दिला नाही.

अधिक स्पष्ट करुन सांगायचं तर, मागच्या दोन्ही सामन्यांत रोहित ना एकेरी धाव चोरताना दिसला, ना पहिली धाव जोरात पळून दुसरी धावही वसूल करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणात त्यानं चेंडूचा पाठलाग करून धावा रोखल्या आहेत किंवा कमालीच्या चपळाईन एखादा झेल पकडला आहे असंही दृश्य दिसलेलं नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीनं रोहित शर्मा फिट आहे असं कसं मानायचं हा जाणकारांचा अजूनही सवाल आहे.

त्यामुळंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला फिटनेसचं प्रमाणपत्र मिळवायचं तर त्याला आयपीएलच्या फायनलमध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावावी लागणार आहे. त्यामुळं एक कर्णधार आणि एक फलंदाज या नात्यानं रोहितची गुणवत्ता फायनलच्या रणांगणात पणाला लागणार आहेच. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा फिटनेस सिद्ध करण्याच्या दृष्टीनं त्याची वेगळी परीक्षाही होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button