breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Ground Report । पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीमध्ये ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’

राज्यातील प्रदेश नेत्यांच्या सूचनेनंतरही इच्छुकांची अतिघाई

महायुतीच्या दूधात मिठाचा खडा; बंडखोरीची बिजपेरणी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तसा पिंपरी-चिंचवडमधील इच्छुकांनी विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली. राज्यात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला असला, तरी सध्यस्थितीला महायुतीमध्ये ‘आमदारकी’साठी इच्छुकची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘‘मी लढणारच… ’’ अशा भूमिकेत इच्छुक असून, महायुतीच्या ‘दूधात मिठाचा खडा’ पडण्याची चिन्हे आहेत.

नुकतच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे देशभरात स्वबळावर २४० जागा मिळवल्या आहेत. मात्र, राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि महाविकास आघाडीला मिळालेली सहानुभूती यामुळे महायुती ‘बॅकफूट’ वर राहिली, हे सर्वश्रूत आहे.

आगामी विधानसभा निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड आणि भोसरी मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर अनुक्रमे अश्विनी जगताप (पोटनिवडणूक) आणि महेश लांडगे विद्यमान आमदार आहेत. पिंपरी मतदार संघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. त्यामुळे शहरातील तीनही मतदार संघामध्ये महायुतीची सत्ता आहे.

‘‘राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे जनमानसांमध्ये भाजपाची प्रतिमा मलीन झाली’’ राज्यातील लोकांना हा राजकीय बदल आवडला नाही..’’ असा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांनी घेतला. भाजपाचे काही ज्येष्ठ नेत्यांचाही हाच सूर आहे. तसेच, अजित पवार गट आणि शिंदे गटाला मंत्रीपद मिळाले नाही. यावरुनही नाराजीनामा सुरू आहे.

हेही वाचा    –      धक्कादायक! आईस्क्रीमच्या कोनमध्ये आढळला बोटाचा तुकडा

परिणामी, महायुतीमधील वातावरण गढूळ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या भाषणात ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन कोणही चर्चा किंवा मीडियाला बाईट देवू नका…’’ महायुतीमधील वातावरण तणावपूर्ण होणार नाही याची काळजी घ्या’’ अशा सूचना दिल्या आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भोसरीमधून, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि माजी नगरसेविका माया बारणे यांनी चिंचवडमधून निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत.

वास्तविक, लोकसभा मतदार झाले आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले काम केले नाही. काही लोकांनी छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीचा प्रचार केला, असा गंभीर आरोप जाहीरपणे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता. तत्पूर्वी, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्याचाही वचपा बारणे अजित पवार गटावर काढण्याची संधी सोडणार नाहीत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्याचा प्रयत्न…

विधानसभा निवडणूक महायुती एकत्रित लढणार, असे संकेत आहेत. किंबहुना, महायुती स्वतंत्रपणे लढल्यास लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे. ‘‘ज्या मतदार संघात ज्या पक्षाचा आमदार.. तो मतदार संघ त्या पक्षाला सोडायचा’’ या सूत्रानुसार, चिंचवडणि भोसरीवर भाजपाचा दावा राहणार आहे, तर पिंपरी राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ‘मेरिट’ च्या आधारे तिकीटवाटप झाले, तर राष्ट्रवादीच्या वाटल्या केवळ १ जागा येणार आहे. याची ‘गॅरंटी’ असल्यामुळे ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्यासाठी महायुतीमधील इच्छुक जोर-बैठका काढत आहेत. या चढाओढीमध्ये कुणाला संधी मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button