कोरोनामुळे आपल्या घरातील कुणाचा मृत्यू झालाय ? 50 हजारांची सरकारी मदत मिळविण्यासाठी ‘येथे’ अर्ज भरा
![Who in your family has died from corona? Apply 'here' to get Rs 50,000 government assistance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/corona-death.jpg)
पुणे | मागील दोन वर्षांपासून सर्वदूर कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. या महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत 26 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून, कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटवर्तीयांना सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
‘अशी’ आहे आर्थिक मदतीसाठी पात्रता
– राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून देण्यात येणार आहे.
– कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात निदानाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.
– कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू झाला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल, तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
– जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे From 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे, अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
– Medical Certificate of Cause of Death (MCCD) मध्ये ‘कोव्हिड-19 मुळे मृत्यू’ या प्रमाणे नोंद नसली तरी ही अटीची पूर्तता होत असल्यास त्या प्रकरणात मदत देण्यात येईल.
अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रे जवळ ठेवा
– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक
– अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील
– मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील
– मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र
– इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र
मदतीचा अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://mahacovid19relief.in/login