#Vaccineforabove18year: १८८ कोटी लसमात्रांची केंद्राची हमी
![‘सीएए’ निदर्शकांवरील वसुली नोटिसा मागे घ्या!; उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/supreme-court-2.jpg)
- सर्वोच्च न्यायालयात आराखडा; वर्षअखेपर्यंत १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण
नवी दिल्ली |
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी करोना लसीकरणाचा आराखडा सादर केला. त्यात वर्षअखेपर्यंत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी पाच लस उत्पादकांकडून सुमारे १८८ कोटी लसमात्रा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १८ वर्षांवरील केवळ ५.६ टक्के नागरिकांनाच दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.
परंतु उर्वरित नागरिकांचे लसीकरण वर्षअखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आणखी १३५ कोटी लसमात्रा खरेदी करण्याबाबतचे नियोजन केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या ३७५ पृष्ठांच्या प्रतिज्ञापत्रात मांडले आहे. अठरा वर्षांवरील नागरिकांची संख्या अंदाजे ९३-९४ कोटी आहे. प्रत्येकी दोन लसमात्रा याप्रमाणे त्यांच्या लसीकरणासाठी १८६ ते १८८ कोटी लसमात्रांची आवश्यकता आहे. त्यापैकी एक कोटी ६० लाख लसमात्रा ३१ जुलैपर्यंत उपलब्ध करण्यात येतील, असे केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.