५ सप्टेंबपर्यंत शिक्षकांच्या लसीकरणाचे लक्ष्य- राजेश टोपे
![Target for teachers to be vaccinated by September 5 - Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Rajesh-Tope-1.jpg)
- शाळा सुरू करण्याच्या दिशेने पहिले पाऊल
जालना |
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ५ सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले. करोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांतील शाळा सुरू करता येतील का, याबाबत कृतिदल विचार करत आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात रात्रीची संचारबंदी?
राज्यात अधिक संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले. देशात केरळपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात असून, जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली होती.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३० सप्टेंबपर्यंत स्थगित
नवी दिल्ली : करोना फैलावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणांवर असलेली स्थगिती ३० सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि, परिस्थितीनुसार सक्षम अधिकारी निवडक मार्गावर नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला परवानगी देऊ शकतात, असे विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) रविवारी स्पष्ट केले. करोना महासाथीमुळे भारतात नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा २३ मार्च २०२० पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत मे २०२० पासून आणि निवडक देशांसोबतच्या द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्थेंतर्गत जुलै २०२० पासून विशेष आंतरराष्ट्रीय सेवा सुरू आहेत.