कल्याण-डोंबिवलीत सापडले नायजेरियातून आलेले सहा प्रवासी; आरोग्य विभागाने चाचणी करुन पाठवले नमुने
![कल्याण-डोंबिवलीत सापडले नायजेरियातून आलेले सहा प्रवासी; आरोग्य विभागाने चाचणी करुन पाठवले नमुने](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/omicron-mumbai.jpg)
कल्याण |
दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोनाग्रस्त असल्याचं आढळल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने इतर देशांमधून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नायजेरिया मधून आलेले सहा प्रवासी सापडले असून या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करुन नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णासोबत विमानातून प्रवास केलेल्या ४२ जणांची यादी आरोग्य विभागाने सरकारकडे पाठवली आहे. या सर्व ४२ जणांची संबंधित महापालिकांकडून चाचणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. करोनाग्रस्त प्रवाशाचा एक सह-प्रवासी कल्याण-डोंबिवलीमधील असून या ५० वर्षीय गृहस्थाची आज करोना चाचणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. असे असले तरी दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचं पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं आहे.