धक्कादायक! सर्पदंश झालेल्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू
![Shocking! Chimukali, who was bitten by a snake, died due to lack of treatment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/snake-venom.jpg)
पालघर |
पालघर तालुक्यातील मनोर परिसरातील वरई गावातील उमतोल पाड्यातील उर्मिला उमतोल या पाच वर्षांच्या मुलीचा शनिवारी सर्पदंशावर वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला. याआधीही उपचाराअभावी आणखी एकास आपला प्राण गमवावा लागला होता. उर्मिला उमतोल या पाच वर्षांच्या मुलीला शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता सर्पदंश झाला होता. मनोर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने तिला तिथे उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे उपचारासाठी फरफट होऊन वेळ निघून गेल्याने उर्मिलाला आपले प्राण गमवावे लागले.
उर्मिला खेळत अडतना तिच्या उजव्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची माहिती तिने वडिलांना दिली. सर्पदंश झाल्याचे लक्षात येत तिला उपचारासाठी गावच्या एका रिक्षातून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. मात्र ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचार होऊ शकत नाही, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर उर्मिलाला मनोरच्या सह्याद्री रुग्णालयात नेले. तिथे तिला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर तिला आस्था रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तिथे तिचा मृत्यू झाला.
वाचा- छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, बेपत्ता कोब्रा कमांडोचं नक्षलवाद्यांकडून अपहरण?