Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

भाजपा नेत्यांना ‘नाचे’, ‘टोणगे’, ‘समाजाला लागलेली कीड’ म्हणत शिवसेनेची टीका; मोदींनाही करुन दिली मास्कची आठवण

मुंबई |

राज्यामध्ये करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरुन आक्षेप घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर शिवसेनेनं कठोर शब्दात टिका केलीय. लोकांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेले निर्बंधांचे निर्णय हे भाजपाच्या नेत्यांना समजणार नाही असा टोला लगावतानाच शिवसेनेनं उत्तर प्रदेशमध्ये गंगेत वाहणारी प्रेतं आणि गुजरातमध्ये अंत्यसंस्कारासाठी दोन-दोन दिवस लागलेल्या रांगाची आठवण करुन दिलीय. इतकच नाही तर शिवसेनेनं निर्बंधांविरोधात बोलणाऱ्या भाजपा नेत्यांसाठी नाचे, टोगणे, समाजाला लागलेली कीड अशी विशेषण वापरली आहेत.

  • …याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे

“राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी धार्मिक स्थळे आणि दारूच्या दुकानांतील गर्दी वाढली आहे. ही गर्दी अशीच वाढत गेली तर धार्मिक स्थळे आणि दारूची दुकाने बंद करावी लागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात रोज ५० हजारांच्या आसपास करोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ८० हजार करोनाग्रस्त रुग्ण देशात सापडले, हे गंभीर असले तरी त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. इस्पितळात जाण्यापेक्षा लोक घरच्या घरीच उपचार घेत आहेत. तज्ञांचे म्हणणे असे की, ज्या वेगाने संसर्ग वाढतोय त्याच वेगाने तो खाली कोसळणार. तरीही पुढच्या तीन महिन्यांत आरोग्यविषयक ताणतणाव वाढण्याची लक्षणे दिसत आहेत, म्हणूनच भारताचे पंतप्रधान मोदी यांनी देशातील करोना स्थितीचा आढावा घेतला. निर्बंधांबाबत काटेकोर राहावे असे त्यांनी सरकारी यंत्रणांना सुचवले, पण याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे. वेगवान लसीकरणावर जोर द्यावा, असे त्यांनी सांगितले. मग मधल्या काळात शंभर कोटी लोकांना लस देण्याचा जो उत्सव साजरा झाला तो नक्की काय होता?,” असा प्रश्न शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारलाय.

  • …तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही

“सरकारी यंत्रणांवर आज प्रचंड ताण आहे. त्यात कोणाशीही चर्चा न करता पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचा मोसम हा करोना वेगाने वाढविण्याचा कारखानाच ठरतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत म्हणूनच चिंता वाटते. महाराष्ट्रासारख्या राज्यात चारशेहून जास्त डॉक्टर करोनाग्रस्त झाले आहेत. हजारो पोलीस बेजार आहेत. मुंबईत रोज २० हजार लोकांना करोना होतोय. राज्यातला आकडा दुप्पट आहे. या प्रमाणात देशात करोनाचा आकडा वाढत राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही,” अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केलीय.

  • एकमेव अपवाद फक्त आमच्या पंतप्रधानांचा

“राजशकट चालविणाऱ्या सर्व यंत्रणा करोनाच्या तापाने फणफणून घरात पडल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात त्यांनी म्हणे देशाच्या जनतेला कळकळीचे आवाहन केले. ते म्हणतात, ‘‘झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कायम सतर्क राहणे गरजेचे असून मास्कचा योग्य वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी आता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हव्यात.’’ मोदी यांनी एकदम योग्य तेच सांगितले, पण हे सर्व तुमच्यापासून सुरू व्हायला हवे. पुतीनपासून बायडेनपर्यंत अनेक जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकीत हे सर्व नेते ‘मास्क’ लावूनच बसलेले दिसतात. एकमेव अपवाद फक्त आमच्या पंतप्रधानांचा,” असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याच्या विषयावरुन टोला लावलाय.

  • ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत

“यापुढे आपल्याला करोनासोबत जगावे लागेल, असे भाकीत दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेच होते. करोनाशी लढाई हा वादाचा व मतभेदाचा विषय असू नये. केंद्र सरकार याबाबतीत ज्या उपाययोजना करू पाहत आहे त्यास राज्य सरकारांनी हातभार लावायला हवा. केंद्र सरकारच्या उपाययोजनांत भ्रष्टाचार सुरू आहे, घोटाळे आहेत, असे आरोप महाराष्ट्रातून कोणी केले नाहीत. राजकारण करायचेच तर ते कोठेही करता येईल, पण महाराष्ट्राची ती नियत नाही. मुंबई-महाराष्ट्रात करोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

  • उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा…

“या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे. मुंबई-महाराष्ट्रात जे कार्य करोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, पण जे चांगले सुरू आहे त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाहीत,” असा टोला भाजपा नेत्यांना लगावला आहे.

  • आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत पण…

“अमेरिकेसारख्या देशात करोनाचा विस्फोट होत आहे. आतापर्यंत तब्बल सहा कोटी नागरिक करोनाबाधित झाले असून आठ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात करोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई-महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपाच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button