सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात झिका विषाणुचा रूग्ण
महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम हाती
![Sangli, district, hospital, campus, Zika, virus, patients, health department, campaign,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/zika-1-780x470.jpg)
सांगली : सांगलीतील जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात झिका विषाणुचा रूग्ण आढळून आल्याने या परिसरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहिम हाती घेतली आहे. यासाठी १३ पथके नियुक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात ४ हजार ६३ जणांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये २५ गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येत असल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील एका वृध्दाच्या तपासणीमध्ये झिका विषाणु आढळून आला. या रूग्णावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर, मध्यवर्ती बसस्थानक रस्ता या परिसरात महापालिकेेने सर्व्हेक्षण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसात केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये सामान्य तापाचे २१ रूग्ण आढळले आहेत. तसेच या परिसरात असलेल्या २५ गर्भवती महिलांच्या रक्तजलाची तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रकृर्तीवर आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.