महाराष्ट्र व इतर राज्यांप्रमाणे दिल्लीतही झपाट्याने करोनाच्या रुग्णांची वाढ
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली |
महाराष्ट्र आणि इतर राज्यांप्रमाणे दिल्लीतही करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १,९०४ रुग्णांची भर पडली. उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेसात हजार झाली आहे. दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन दिल्ली सरकारने होळीच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली होती. त्यामुळे सोमवारी धुळवडीला राजधानीत शुकशुकाट होता. सार्वजनिक ठिकाणी होळी-धुळवड साजरी करण्यावर बंदी घालण्याचा आदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी जारी केला होता. त्यामुळे खुली मैदाने, रस्ते, निवासांबाहेरील मोकळी जागा, बाजार अशा कुठल्याही गर्दी होऊ शकणाऱ्या ठिकाणांवर कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली.
पुढील वर्षी होळी साजरी करण्याचे आवाहन दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारी सर्वत्र पोलीस तैनात होते. मेट्रो आणि बससेवादेखील सोमवारी दुपारी २ नंतर सुरू करण्यात आली. बंदी आदेश मोडल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. राजधानीमध्ये रविवारी दिवसभरात झालेली सुमारे दोन हजार रुग्णांची वाढ ही गेल्या साडेतीन महिन्यांतील सर्वाधिक दैनंदिन वाढ असून संसर्गदर २.७७ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिल्ली सरकारतर्फे सांगण्यात आले.
वाचा- शिवसेनेचे मंत्री अडचणीत येणार? किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार