‘प्राणवायू उपलब्ध होईल’; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा दावा
![“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू नाही”; उत्तर प्रदेश सरकारचा दावा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen_tank.jpg)
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा दावा
लातूर |
जिल्ह्य़ाला ३० मेट्रिक टन दररोज ऑक्सिजनच्या पुरवठय़ाची गरज असून जिल्ह्य़ाची साठवणूक क्षमता ५६ मेट्रिक टनाची आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध केला जाईल व रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देऊ, असे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अडचण असल्यास पालकमंत्री कार्यालयास दूरध्वनी करावा, असे आवाहन केले आहे. बऱ्याच कालावधीनंतर अमित देशमुख बुधवारी सकाळी लातूर येथे दाखल झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड रुग्णांसंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. करोनाचा उद्रेक गतवर्षीपेक्षा मोठा आहे. रुग्णसेवा, औषधोपचार यावर मोठा ताण आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सेवा अधिक व्यापक प्रमाणात देण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. आपले प्रश्न व अडचणी आमच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधून सांगाव्यात. २४ तास ही सेवा खुली राहणार असून जनतेशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आपण लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले.
- १२० खाटा उपलब्ध करणार
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखीन १२० खाटा उपलब्ध करता येऊ शकतात. आज रात्रीपासून त्या खाटा उपलब्ध करून उद्यापासून रुग्णांसाठी खुल्या करता येतील, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. लातूर शहरात सुमारे २०० रुग्णालये आहेत. शासनाच्यावतीने ज्यांच्याकडे सोयी उपलब्ध आहेत अशा रुग्णालयांनी अर्ज केल्यास त्यांना परवानगी देण्यात येईल असे जाहीर केले होते. सुमारे १८२ रुग्णालयांनी शासनाकडे अर्ज केला असून त्यांच्या क्षमता तपासून परवानगी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
वाचा- करोनाचं विदारक वास्तव! एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार; स्मशानभूमीही पडली अपुरी!