मिरजेतील कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती
![Oxygen leak at Kovid Hospital in Miraj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/oxygen-leakage.jpg)
सांगली |
मिरजेतील करोना रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री साठवण केंद्राजवळ प्राणवायूची गळती झाल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. मात्र अवघ्या १५ मिनिटामध्ये ही गळती रोखण्यात यश आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सध्या करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून या ठिकाणी असलेल्या ७ केएल क्षमतेच्या टाकीजवळ व्हॉल्वपासून प्राणवायूची गळती अचानकपणे सुरू झाली. ही बाब कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांने तात्काळ याची कल्पना वरिष्ठांना दिली.
अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिका अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही गळती रोखण्यात अवघ्या १५ मिनिटात यश आल्याने वरिष्ठांनी सुस्कारा सोडला. मात्र, रूग्णांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात येणाऱ्या नलिकांना काहीही झालेले नसल्याने काळजीचे कारण नव्हते. तरीही आज तंत्रज्ञांनी येउन पाहणी केली असून याची दुरूस्ती येत्या दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे डॉ. नणंदकर यांनी गुरुवारी सांगितले.