मनसेचे नेते वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार? अजित पवारांची तात्यांना ऑफर

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार आणि वसंत मोरे यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास मनसेला मोठा धक्का बसणार आहे.
वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला आपल्या गटात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
पुण्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. त्यावेळी अजितदादांनी वसंत मोरे यांच्याशी हस्तांदोलन करत, ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असे म्हणत वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचे मान्य केले. पण मी मनसे पक्ष सोडणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. परंतु, पुण्यातील मनसे पक्षसंघटनेतील अंतर्गत गटबाजी पाहता वसंत मोरे यांचा हा निर्धार आणखी किती दिवस टिकणार, हे पाहावे लागेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर वसंत मोरे हे काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरेल.
काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे वाजले तर त्याठिकाणी जाऊन हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. वसंत मोरे यांनी मात्र आपल्या मतदारसंघात राज ठाकरे यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला होता. माझ्या मतदारसंघातील मुस्लीम मतदार नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहिले आहेत. आता त्यांच्या मशिदीसमोर जाऊन हनुमान चालिसा कशी लावू, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला होता. वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसेचे नेते नाराज झाले होते. परंतु, वसंत मोरे शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. त्यानंतर वसंत मोरे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले होते. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
वसंत मोरेंच्या खंद्या समर्थकाची पदावरून हकालपट्टी
पुण्यात वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा असतानाच दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली होती. निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. काही महिन्यांपूर्वी निलेश माझिरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा वसंत मोरे यांनी माझिरे यांना शिवतीर्थवर नेऊन राज ठाकरेंसोबत त्यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु, अवघ्या पाच महिन्यांतच राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची पदावरून उचलबांगडी केली.