सोलापूर जिल्ह्यात आज महालसीकरण मोहीम
![India will soon set a record of 1 billion corona vaccines](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/coronavirus-vaccine-1-2-1-1-2-2.jpg)
सोलापूर |
मागील दोन आठवडय़ापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत असून शुक्रवारी दोन लाख मात्रा प्राप्त झाल्या. या सर्व मात्रा एकाच दिवशी वापरल्या जातील, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार उद्या शनिवारी एकाच दिवशी महालसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. आतापर्यंत शासनाच्या निकषाप्रमाणे उपलब्ध होणाऱ्या लशींच्या मात्रा विनाविलंब वापरल्या जात असल्यामुळे शासनाकडून जिल्हा ग्रामीणसाठी एकाचवेळी दोन लाख मात्रा उपलब्ध झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्राप्त झालेली लस एकाच दिवशी संपेल असे लसीकरणाचे योग्य नियोजन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कूपनची व्यवस्था राबवल्यामुळे लसीकरणाच्या कामात सुसूत्रता आली. उद्या शनिवारी संपूर्ण जिल्हाभर ‘वॉक इन व्हॅक्सीनेशन’ मोहीम राबविण्यात येणार आहे.