#Lockdown: लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्या परदेशी पर्यटकांकडून पोलिसांनी ५०० वेळा लिहून घेतला माफीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Foreigners.jpg)
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये नियमांचे उल्लंघन करणं उत्तरखंडमधील काही परदेशी पर्यटकांना खूपच महागात पडलं आहे. स्थानिक पोलिसांनी या पर्यटकांवर कारवाई तर केलीच शिवाय त्यांच्याकडून ‘Didn’t follow lockdown, I am sorry’ हे वाक्य ५०० वेळा लिहून घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेहरी गढवाल तालुक्यातील तपोवन परिसरामध्ये साई गंगा घाट येथे काही पर्यटक गंगा नदीमध्ये स्थान करण्यासाठी जमा झाले होते. यामध्ये सहा पुरुष आणि चार महिलांचा समावेश होता. इस्रायल, ऑस्ट्रेलिया, मॅक्सीको आणि लॅटव्हीया देशामधील हे नागरीक आहेत. “निर्बंध उठवण्यात आलेल्या सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या काळात आम्ही फिरू शकतो असं आम्हाला वाटलं. या तासांमध्ये आम्ही गंगेच्या काठावर ध्यान करण्यासाठी आलो होतो,” असं या पर्यटकांनी पोलिसांना सांगितलं. “केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी निर्बंध उठवण्यात आले आहेत, असं मी त्यांना सांगितलं,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी दिली.
पोलिसांनी या दहा जणांवर कारवाई केली. मात्र केवळ माफी मागून त्यांना पोलिसांनी सोडले नाही. प्रत्येकाला कोरे कागद वाटण्यात आले. त्यावर प्रत्येकाकडून ‘Didn’t follow lockdown, I am sorry’ हे वाक्य चक्क ५०० वेळा लिहून घेण्यात आलं. ५०० वेळा माफी मागितलेला हा कागद पोलिसांना दिल्यानंतरच इशारा देत या पर्यटकांना सोडून देण्यात आलं.