माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची ‘आप’च्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रभारीपदी नेमणूक
![Former MP Haribhau Rathod's AAP's Pimpri-Chinchwad Municipal Corporation election in-charge.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Aap-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व जागा लढणार असल्याची घोषणा आपले राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी आज दिनांक नऊ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत केली.
माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभारी पदी नेमणूक करण्यात आल्यानंतर राठोड यांचा पहिला दौरा आज पिंपरी चिंचवड मध्ये होता शहरातील कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकी संदर्भात आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित घेण्यात आली. यामध्ये बोलताना राठोड म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी निवडणुका लढणार असून दिल्ली आणि पंजाब प्रमाणे सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता हस्तगत करू. कारण भल्या भल्या प्रस्थापितांना धूळ चारण्याची किमया ही सर्व सामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर होत असते. मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आयाराम गायारम संस्कृतीला आप थारा देणार नाही.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा असून त्यादृष्टीने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून मोफत दर्जेदार शिक्षण मोफत, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, विद्यार्थी आणि महिला यांना मोफत बस प्रवास ही आमच्या विजन डॉक्युमेंट असणार आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंतच्या सर्व प्रकल्पांचे महालेखापाल CAG मार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत असल्याचे राठोड यांनी सांगितले.
श्रमिक नगरी मधील हक्कांच्या घराच्या सर्व योजनांमधील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यास वचनबद्ध आहोत. यावेळी मा हरिभाऊ राठोड- माजी खासदार, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य, प्रभारी पिंपरी चिंचवड शहर मा. मुकुंद कीर्दत- राज्य प्रवक्ते, मा.चेतन बेंद्रे – कार्यकारी अध्यक्ष पिंपरी चिंचवड आणि मा. अनुप शर्मा- शहराध्यक्ष उपस्थित होते.