#Covid-19: बीडमध्ये रुग्णसंख्येत वाढ; निर्बंध कायम
- शनिवार, रविवारी सर्व व्यवहार बंद
बीड |
बीड जिल्ह्य़ात शनिवारी रुग्णसंख्येत शुक्रवारच्या तुलनेत ५० ने वाढ झाली आहे. करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५.२२ टक्कय़ांवर असल्याने जिल्ह्यतील निर्बंध सोमवारनंतरही कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी स्पष्ट केले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने त्याचप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतची सवलत आणि शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यत करोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होऊ लागली आहे. शुक्रवारी नवीन १३० बाधितांची नोंद झाल्यानंतर शनिवारी मात्र रुग्णसंख्या १८० पर्यंत गेली आहे. विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव अजूनही कायम असल्याने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.