#Covid-19: अनिल अंबानींना महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांचा दणका; इव्हिनिंग वॉक केलं बंद
![# Covid-19: Anil Ambani hit by Mahabaleshwar chief minister; Evening walk off](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Anil-Ambani.jpg)
महाबळेश्वर |
रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र लॉकडाउन असतानाही रविवारी सायंकाळी अंबानी दांपत्य आपल्या दोन्ही मुलांसहीत महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर वॉकसाठी आले होते. त्यामुळेच पालिकेने या गोल्फ मैदानाची मालकी असणाऱ्या संस्थेला नोटीस बजावली आहे. तसेच दंडात्मक कारवाईचा इशारा दिल्यामुळे दि गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळं ठोकलं आहे. या मैदानात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाहीय. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथील थंड हवा आणि अल्हाददायक वातावरणामुळे अनेक नामवंत व्यक्तींपासून सर्वसामान्यही दरवर्षी आवर्जून महाबळेश्वरला खास करुन उन्हाळ्यात भेट देतात. महाबळेश्वर येथे नियमित सुट्टी व सहलीसाठी अनेक उद्योगपती येत असतात. अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचे बंगले, फार्म हाऊस महाबळेश्वर पाचगणी येथे आहेत. या परिसरात मराठी, हिंदी, भोजपुरी भाषांमधील चित्रपट, मालिका,जाहिराती, वेब सिरीजची चित्रीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याने या सेलिब्रिटी आणि उद्योजक यांचे नियमित येजा सुरु असते.
अंबानी बंधुही अनेकदा महाबळेश्वरला जातात. मुकेश अंबानी यांनाही महाबळेश्वर विशेष आवडत असल्याचे समजते. त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम महाबळेश्वर येथेच आयोजित केला होता. मुकेश यांचे धाकटे बंधून अनिल सुद्धा अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर महाबळेश्वरला येतात. मात्र राज्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कालावधीमध्ये अनिल अंबानी आपल्या कुटुंबीयांसहीत महाबळेश्वरला आले आहेत. ते डायमंड किंग नावाने प्रसिद्ध असणाऱ्या उद्योगपती अनुप मेहतांच्या बंगल्यावर वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून येथेच असलेले अनिल अंबानी सकाळ, संध्याकाळ आवर्जून वॉकसाठी बाहेर पडतात. अनिल हे रोज आवर्जून वॉकला जातात. अनेक दिवस येथे मुक्कामी असल्याने अनिल अंबानी आपल्या म्हबळेश्वरातील नियमित सवयीप्रमाणे दररोज सकाळ आणि संध्याकाळी चालण्यासाठी (मॉर्निंग व इव्हनिग वॉक) गोल्फ मैदानावर व इतर सुरक्षित ठिकाणी बाहेर पडतात. मुंबई अथवा महाबळेश्वर चालण्याची सवय असल्याने अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर चालण्यासाठी येतात याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखिल चालण्यासाठी नियमित येत असतात. अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज गोल्फ मैदानावर नियमिय येतात याची बातमी शहरात पसरली. त्यामुळे चालण्यासाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर चालणे सुरू केले. त्या मुळे हळूहळू या मैदानावर सकाळी संध्याकाळी नागरीकांची गर्दी होऊ लागली.
लॉकडाउन व संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही उदयोगपती हे नियमित चालण्यासाठी (वॉक) घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने याबाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि गोल्फ क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली. सध्याच्या नियामांनुसार संचार बंदी जाहीर करण्यात आलेली असताना आपल्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरीक इव्हिनिंग वॉक साठी येत आहेत. सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असताना तुमच्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरिक सायंकाळी चालण्यासाठी येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही नोटीस प्राप्त होताच तातडीने गोल्फ मैदान सायंकाळी चालायला येणाऱ्यांसाठी बंद करण्यात यावे. या ठिकाणी इव्हिनिंग वॉकसाठी नागरीकांना प्रवेश दिला जाऊ नये. अन्यथा या जागेची मालकी असणाऱ्यांविरोधातआपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलाय. मैदानाच्या प्रवेश व्दारावरच गोल्फ मैदानावर नागरीकांना फिरणे चालण्यासाठी आज पासुन हे मैदान बंद करण्यात आले आहे. पालिकेच्या धाडसी निर्णयाचे शहरातुन कौतुक होत आहे. मात्र आता मॉर्निंग इव्हिनिंग वॉक साठी कुठे जायचे हा प्रश्न उदयोगपती अनिल अंबानी यांनी स्थानिक प्रशासनाला विचारला तर आश्चर्य वाटायला नको. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुका सर्वात लहान असून येथेही करोना बाधितांची संख्या मात्र मोठी आहे. यामुळे प्रशासन दबावाखाली आहे.त्यामुळे काही स्थानिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
वाचा- #Covid-19: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अमरावतीला भरघोस मदत