#CoronavirusUP: अमानुषतेचा कळस! रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दीड महिन्यांनी फोन करून केली तब्येतीची चौकशी
![A large drop in the number of corona patients in the country; The number of patients recovering also increased](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5.jpg)
उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी राजधानी लखनऊमधील आरोग्य व्यवस्था ही राम भरोसे असल्याचं चित्र दिसत आहे. करोनाबाधितांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणारी यंत्रणा तर अगदीच बिकट परिस्थितीमध्ये आहे. करोनाबाधितांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणारी यंत्रणेची पोलखोल करणारे काही धक्कादायक प्रकार समोर आले असून याबद्दल नाराजी व्यक्त केली जातेय. दोन महिन्यापूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण बरे झालेत की त्यांचा मृत्यू झालाय याचा तपास आरोग्य यंत्रणेमार्फत आता फोनवरुन केला जात आहे. या सर्व गोंधळामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेले नातेवाईक इतके नाजार आहेत की अनेकजण या कॉलला प्रतिसादच देत नाहीत किंवा थेट कर्मचाऱ्यांना त्यांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल नाराजी बोलून दाखवत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतलीय.
मागील काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून फोन केले जात आहेत. फोनवरुनच करोनाबाधित रुग्णाच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार गोमतीनगर येथील रहिवाशी आणि बलरामपूर रुग्णालयाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. डी. पी. मिश्रा यांची पत्नी कुमुद यांना करोनाचा संसर्ग झाला होता. २७ एप्रिल रोजी उपचारादरम्यान कुमुद यांचं निधन झालं. कोविन पोर्टलवर कुमुद यांना करोनाची लागण झाल्याची माहिती अपलोड करुन दीड महिना झाल्यानंतर आरोग्य विभागाला जागा आली. २७ एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या कुमुद यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने नुकताच डॉ. डी. पी. मिश्रा यांना फोन केला होता. संतापलेल्या मिश्रा यांनी फोन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.