#CoronaVirus: ‘समूह प्रतिकारशक्तीचा पर्याय भारतासाठी जोखमीचा’
![# Covid-19: Decline in the number of active patients in the country, today only 1,84,408 active patients - Ministry of Health](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024.jpg)
लोकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती निर्माण होऊ देण्याचा मार्ग करोनाविरोधातील उपायांमध्ये शहाणपणाचा म्हणता येणार नाही, कारण अशी समूह प्रतिकारशक्ती ही लोकसंख्येतील ६०-७० टक्के लोकांना संसर्ग झाल्यानंतरच निर्माण होऊ शकते. इतक्या मोठय़ा प्रमाणात करोनाचा संसर्ग लोकांना होऊ देण्याआधीच उपलब्ध वैद्यकीय मार्गानी हस्तक्षेप करणे योग्य ठरेल, असे मत औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे.
सामुदायिक प्रतिकारशक्ती ज्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो ती लोकसंख्येतील बऱ्याच लोकांना रोगाचा संसर्ग झाल्यानंतर निर्माण होऊ शकते किंवा लस टोचूनही ती निर्माण करता येते असे सांगून ते म्हणाले की, समूह प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या लोकांना संसर्ग होऊ देऊन निर्माण करणे धोक्याचे असते त्यामुळेच तर आपण लशीच्या शोधात आहोत. लस उपलब्ध झाल्यानंतर हा रोग पसरणार नाही. कारण त्यामुळे रोगवाहक व्यक्तींचे प्रमाण कमी असेल. भारतासारख्या जास्त लोकसंख्येच्या देशाला समूह प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा पर्याय जोखमीचा आहे. कारण ६०-७० टक्के लोक रोगग्रस्त झाले तरच समूह प्रतिकारशक्ती तयार होत असते.
आतापर्यंत अनेक पातळीवर सैद्धांतिक प्रारूपे तयार करण्यात आली असून त्यांच्या माहितीनुसार करोना संसर्गाच्या अनेक लहान मोठय़ा लाटा येत राहतील. त्यासाठी लोकांनी सज्ज राहिले पाहिजे, पण रुग्णांची संख्या कमी होत जाईल हेही लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडले आहेत त्यावर त्यांनी सांगितले की, हे चांगले लक्षण नाही. जागतिक आरोग्य संघटना ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. पोलिओ निर्मूलन व इतर अनेक गोष्टीत त्या संघटनेचे मोठे काम आहे.
लस निर्मितीबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रतिकारशक्ती वाढवणारी लस तयार करण्यात येत असून त्यावर तीन ठिकाणी काम चालू आहे. पंधरा दिवसात त्याचे निकाल हाती येतील. मोनोक्लोनल प्रतिपिंडावर आधारित लस तयार करण्यात येत असून त्यात पुण्याचे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र , सीएसआयआर, आयआयटी इंदूर, भारत बायोटेक यांचा सहभाग आहे. तिसरी बहुगुणी रक्तद्रव उपचार पद्धती गुणकारी असून त्यावर कोलकात्यात चाचण्या सुरू आहेत. लस निर्मितीत भारतीय कंपन्या झटून काम करीत आहेत.