#CoronaVirus: विमानातील प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/airplanedisplay.jpg)
दिल्लीहून लुधियानाला जाणाऱ्या अलायन्स एअरच्या विमानातील एका प्रवाशाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, विमानाच्या पाच कर्मचाऱ्यांसह एकूण ४१ लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे एअर इंडियाने बुधवारी सांगितले.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे दोन महिने बंद राहिलेली देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यानंतर २५ मे रोजी हे उड्डाण करण्यात आले होते. क्षेत्रीय विमान सेवा संचालित करणारी अलायन्स एअर ही एअर इंडियाचा भाग आहे.
‘२५ मे रोजीच्या दिल्ली- लुधियाना विमानात प्रवास करणारा एक प्रवासी दुसऱ्या दिवशी कोविड पॉझिटिव्ह आढळून आला. या विमानातील सर्व प्रवासी आता विलगीकरणात आहेत,’ असे एअर इंडियाचा प्रवक्ता म्हणाला.
दिल्लीहून सोमवारी आलेल्या विमानातून साहनेवाल विमानतळावर उतरलेल्या १० जणांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सिव्हिल सर्जन राजेश बग्गा यांनी लुधियाना येथे दिली. यापैकी ५० वर्षांच्या एका इसमाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिल्लीचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार, या विमानात ३६ प्रवासी आणि पाच कर्मचारी होते.