#CoronaVirus: ‘लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कोरोना प्रसार ही अतिदुर्मीळ बाब’
लक्षणे नसलेल्या रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीस करोनाचा संसर्ग होण्याची बाब अतिदुर्मीळ असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. मात्र, त्याबाबत जगभरातील अनेक तज्ज्ञांनी सहमत नसल्याचे स्पष्ट केले.
‘करोनाच्या फैलावाबाबत अनेक देशांची तपशीलासह आकडेवारी आमच्याकडे आहे. लागण झालेल्या मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून दुसऱ्यांना या विषाणूची बाधा होणे हे अतिदुर्मीळ असल्याचे अनेक देशांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले’, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले. अनेक देशांनी लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली. मात्र, अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झालेला नसल्याचे बहुतांश प्रकरणांत आढळले. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
याबाबत जगभरातील तज्ज्ञांनी मात्र असहमती दर्शवली. असे मत नोंदविणे हे संभ्रम निर्माण करणारे असून, पुरेशा आकडेवारीचाही अभाव आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. जागतिक आरोग्य संघटनेने पुरेशा आकडेवारीचा आधार घेऊन असे निरीक्षण नोंदवणे योग्य ठरले असते, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.