#CoronaVirus: डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या ३३ रुग्णालयांच्या डॉक्टरांची सोमवारी बैठक घेतली. या योजनेत रुग्णांना मोफत उपचार केले जातात. बैठकीत शहरातील १२ डॉक्टर उपस्थित होते. जिल्ह्यातील डॉक्टरांनी दृकश्राव्य माध्यमव्दारे चर्चेत सहभाग घेतला.
करोनाग्रस्तांवरा उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे सुरुवातीला ४०० ते ५०० खाटांचे नियोजन करण्यात येणार आहे. तर अतिदक्षता कक्षात १०० खाटा राहणार आहेत. रुग्णसंख्या वाढतील तशा सुविधा अद्ययावत करून सामग्री कमी पडू देऊ नका, व्हेंटिलेटरच्या सुविधा उपलब्ध ठेवा, नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
कुठल्याही प्रकारच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारू नये. रुग्णांना सेवा नाकारली असे लक्षात आले तर डॉक्टरवर कारवाई केली जाईल, अशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.
-जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे