साताऱ्यात जम्बो कोविड रुग्णालयाबाहेर सुरक्षारक्षक म्हणून आता ‘बाउन्सर’!
!['Bouncer' now as a security guard outside Jumbo Kovid Hospital in Satara!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/raj01-1.jpg)
वाई |
साताऱ्यातील जम्बो कोविड रुग्णालयाच्या बाहेर परिसरात सुरक्षारक्षक म्हणून आता चक्क बाउंसर नेमण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयाबाहेर मारामारीचा प्रकार घडल्यानंतर हा बंदोबस्त लावण्यात आल्याचे समजते. सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जम्बो कोविड रुग्णालय उभारले. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची, नातेवाईक अन्य व्यवस्थेशी जोडलेल्यांची नेहमीच गर्दी असते. यातून येथे बऱ्याचदा वादाचे प्रसंगही घडतात. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयाबाहेर मारामारीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षारक्षक म्हणून सोळा बाउंसर तैनात केले आहेत.
दरम्यान, या नेमणुकीवरून काहींकडून संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयात उपचार घेताना या बाउंसरमुळे अडथळा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात खाट मिळावी म्हणून ताटकळणाऱ्या नातेवाइकांना दिलासा देण्याची गरज असताना रुग्णालय प्रशासनाने या परिसरात अचानक सुरक्षारक्षक म्हणून बाउंसर तैनात केले आहेत. हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे सांगत सातारकरांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्णालय परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी तेथे पोलीस दलाकडून नियमित बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये बाउंसर नियुक्त करण्याचा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. याच्याशी आमचा संबंध नाही.
– अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक
जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये बाउंसर्स नेमण्याच्या निर्णयाची आपण माहिती घेऊ. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. बाउंसर्स नेमण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर असा निर्णय का घेतला गेला आहे याबाबत त्यांना विचारू. तसेच याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करू.
– शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री