केंद्राकडून लसीचा अपुरा पुरवठा होत आहे त्यात आशिष शेलारांनी त्यात लक्ष घालावं; जयंत पाटील
सांगली: सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य शासनाच्या धोरणानुसार १० टक्के पेक्षा कमी कोविड पॉझिटीव्हीटी दर आल्याशिवाय सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता आणता येणार नाही. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. केंद्राकडून लसी कमी येत आहेत. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी लसपुरवठ्यामध्ये लक्ष घालावं. त्यांनी केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना लगावला.
कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांची यंत्रणांनी, नागरिकांनी कठोर अंमलबजावणी करावी. रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, भाजीपाला घरपोच पोहोचविण्यावर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी. यासाठी व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याचे मान्य केले आहे, ही जमेची बाजू आहे.
सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे, असा घणाघाती हल्ला केला होता. त्यानंतर याच टीकेला प्रत्यूत्तर म्हणून जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
विरोधक त्यांचं काम करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे. लसीचा पुरवठा कमी होत आहे. याबाबत केंद्र सरकारने जबाबदारी घ्यायला हवी. सांगलीमध्ये लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि केंद्राकडून लस उपलब्ध करून द्यावी, असे जयंत पाटील म्हणाले.