सेना नेते राजेश क्षीरसागरांवर अँजिओप्लास्टी, उद्धव ठाकरेंची फोन करत आपुलकीने विचारपूस
![सेना नेते राजेश क्षीरसागरांवर अँजिओप्लास्टी, उद्धव ठाकरेंची फोन करत आपुलकीने विचारपूस](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/सेना-नेते-राजेश-क्षीरसागरांवर-अँजिओप्लास्टी-उद्धव-ठाकरेंची-फोन-करत-आपुलकीने.jpg)
कोल्हापूर: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर शहरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. राजेश क्षीरसागर यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आपुलकीने फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. गुरुवार (२६ मे) काल रात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या छातीत छोटासा ब्लॉकेज असल्याची माहिती आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले तीन -चार दिवस होणाऱ्या बैठका, काल छत्रपती ताराराणी चौक येथील आंदोलन आणि सातत्याने नियोजन मंडळाच्या होणाऱ्या बैठका यामुळे झालेला कामाचा अतिरिक्त ताण क्षीरसागर यांना जाणवत होता. काल मध्यरात्री छातीत सौम्य दुखू लागल्याने त्यांना तात्काळ कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. यामध्ये एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तात्काळ क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. साईप्रसाद यांच्या देखरेखीखाली क्षीरसागर यांच्यावर उपचार सुरु असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: संपर्क साधून राजेश क्षीरसागर यांच्या प्रकृतीबाबत आपुलकीने विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधला. यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री आमदर दिवाकर रावते यांनीही संपर्क साधून राजेश क्षीरसागर यांची विचारपूस केली.