माणसांच्या गर्दीतील ‘देवदूत’ : हृदयविकाराच्या रुग्णाला मिळाले ‘जीवदान’
!['Angel' in crowd of people: Heart disease patient gets 'life donation'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Deepak-Sharma-780x470.jpg)
रुग्णसेवेचा वसा जपणारे दिपक शर्मा यांची अमूल्य तत्परता
डी.एस. के. कुंजबन सोसायटीधारकांनीही जपली ‘मानवता’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपआपल्या नोकरी-व्यावसायात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे. सुखाच्या- आनंदाच्या क्षणी सर्वजण सहभागी होतात. मात्र, अडचणी काळात आपलेच परके होतात, असा अनुभव ऐकायला आणि अनुभवायलाही मिळतो. परंतु, आजही समाजामध्ये ‘मानवता’ धर्माचे पालन करणारे ‘देवदूत’ आहेत. याचा प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते व आमदार महेश लांडगे यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख दिपक शर्मा यांच्या अविरत कार्यातून येतो.
पुनावळे- काटेवस्ती येथे डी.एस. के. कुंजबन नावाची सोसायटी आहे. सुमारे ३०० सदनिका असलेल्या सोसायटीत बहुभाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे महेताब गन्नी मोमीन (वय-४२) यांना ‘ऑन ड्युटी’ असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. प्रचंड अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
हृदयविकाराच्या धक्क्यातून मोमीन यांना सुरक्षित सावरण्यासाठी सुमारे ६० हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगीतले. मात्र, मोमीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एवढ्या कमी वेळेत मोठ्याप्रमाणात पैसे कुठून आणणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.
डी.एस.के. सोसायटीने जपली माणूसकी…
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डी.एस.के. कुंजबन सोसायटीचे सचिव श्री. उत्तम नलावडे आणि चेअरमन श्री. योगेश सूर्यवंशी व अभिजीत वाळवेकर यांच्यासह सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पैशांची तजवीज केली. या माध्यमातून एन्जिओग्राफी करण्यात आली. मात्र, अद्याप धोका टळलेला नव्हता. डॉक्टरांनी एन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. तोपर्यंत मोमीन यांचे मुंबई आणि लातूर येथील नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. पाच दिवसांत सुमारे दीड लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च झाला. आता पैसे कसे उभा करायचे? असे संकट पुन्हा समोर उभा राहीले. सोसायटीधारकांनी वर्गणी जमा करुन पैशाची मदत करण्याची तयारी केली. त्याला सोसायटीतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे ७५ हजार रुपये इतकी मदत एका दिवसांत सोसायटीतील नागरिकांनी उभी केली.
दिपक शर्मा मदतीला धावले…
दरम्यान, सोसायटीतील काही नागरिकांनी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख व समाजिक कार्यकर्ते दिपक शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शर्मा यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. सुमारे दीड लाख रुपयांचे बील झाले आहे. नातेवाईक व सोसायटीधारक सर्वांनी प्रयत्न करुन लाखभर रुपये जमा झाले आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासन बील कमी करण्यास नकार देत आहे, असे गाऱ्हाणे नातेवाईकांनी त्यांच्यासमोर मांडले. क्षणाचाही विलंब न करता शर्मा यांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संपर्क केला. त्याद्वारे मुख्यमंत्री सचिवालयाकडून मदतीसाठीचे पत्र घेतले. तसेच, स्थानिक भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहायक श्री. कांबळे यांच्या मदतीने आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत बील कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर एन्जिओप्लास्टीच्या उपचारासाठी कार्यवाही सुरू केली.
…अन् निशुल्क शस्त्रक्रिया यशस्वी झाली!
घरची आर्थिक परिस्थिती बेताची, तीन मुली आणि सर्वसामान्य कुटुंबातील महेताब मोमीन यांच्यावर एन्जिओप्लास्टी ऑपरेशन करावे लागेल. त्यामुळे रावेत येथील ग्लोबल रुग्णालयातून थेट वायसीएममधील रुबी अलकेअर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. याकामी सर्व कागदोपत्री तयारी दिपक शर्मा यांनी स्वत: उपस्थित राहून केली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोमीन यांच्यावर एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. खासगी रुग्णालयामध्ये तीन ते साडेतील लाख रुपये खर्च अपेक्षीत असलेले उपचार कोणतेही शुल्क न भरता महात्मा फुले आरोग्य योजनेतून करण्यात आले. मोमीन कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. नातेवाईक आणि सोसायटीधारकांनीही दिपक शर्मा यांच्याप्रती ‘दुवा’ व्यक्त केली. आता मोमीन यांना घरी सोडण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.
‘‘रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा’’ या भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून समाजसेवा करीत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कामकाज करीत असताना अनेक गोरगरिब लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे समाधान वाटते. कोविड काळातही कक्षाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पुढील काळातही हा मदतीचा वसा जोपासण्याचा आमचा संकल्प आहे.
दिपक शर्मा, प्रमुख, वैद्यकीय सहाय्यता कक्ष,
आमदार महेश लांडगे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Momin-1-758x1024.jpeg)