तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्णांचा अंदाज- सुधीर मुनगंटीवार
![An estimated 20,000 patients in the third wave - Sudhir Mungantiwar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Sudhir-Mungantiwar.jpg)
- योग्य नियोजन करा- आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर |
करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या २० हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ९ हजार रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये राहण्याचा अंदाज आहे. त्यावेळी २५०० प्राणवायू खाटा, ८५० अतिदक्षता खाटा तर ४२५ व्हेंटिलेटर खाटांची गरज पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जम्बो केअर सेंटरमध्ये २०० खाटा, सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये २०० खाटा तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये ४७५ खाटा वाढवण्यात येणार आहे. आरोग्य संसाधनांचे योग्य नियोजन करा, असे निर्देश माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर आभासी बैठक घेतली. सध्या ४००० जण कोविड केअर सेंटरमध्ये राहू शकतात. १३०० प्राणवायू खाटा आहेत. व्हेंटिलेटर खाटा १०५ असून त्यातील ९४ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत.
जिल्ह्य़ातून ५० व्हेंटिलेटर आयुक्त व ८० व्हेंटिलेटर मेडिकल एज्युकेशन विभागाकडून मागवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यापैकी २४ व्हेंटिलेटर आले आहेत. उर्वरित व्हेंटिलेटरसाठी अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी प्रस्ताव तयार करून पाठवावा असे आ. मुनगंटीवार यांनी दिले. लिक्विड ऑक्सिजन ५७ मेट्रीक टन हवे जे ५६.३४ मेट्रीक टन उपलब्ध आहे. पीएसए ऑक्सिजन १६ मेट्रीक टन हवे जे १५ मेट्रीक टन उपलब्ध आहे. सिलेंडर ऑक्सिजन ८ मेट्रीक टन हवे जे १० मेट्रीक टन उपलब्ध आहे. जम्बो केअर सेंटरमध्ये २०० बेड्स, सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये २०० बेड्स तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये ४७५ बेड्स वाढीव मिळतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यावर एक श्वेतपत्रिका पुढील १५ दिवसात जि.प. अध्यक्ष तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तयार करावा, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. जिल्ह्य़ात लसीकरणासाठी २६० सेंटर्स असून सध्या एका दिवशी २५ हजार लोकांचे लसीकरण आपण करू शकतो असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
- जिल्ह्यत म्युकरमायकोसिसचे १०७ रुग्ण
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्य़ात आतापर्यंत १०७ रुग्ण आढळले. यापैकी ६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ३६ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. ५ रुग्णांचा यात बळी गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मूल येथे ५० प्राणवायू पाईपलाईन अंतिम टप्प्यात असून आयसोलेशन सेंटर्ससाठी जिल्ह्य़ातील ५८ शाळांचे नूतनीकरण करावे. १५ पैकी ११ तालुक्यात मानव विकास निधी तर उरलेल्या तालुक्यात खनिज विकास निधीतून नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले.