साताऱ्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय
![Administration's decision to stop house separation in Satara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/home-.jpg)
वाई |
सातारा जिल्ह्य़ातील करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सातारा प्रशासनाने गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ जिल्ह्य़ांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. या जिल्ह्य़ातील करोनाची साखळी तोडण्यासाठी गृह विलगीकरण बंद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या आदेशान्वये घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेड झोन मधील या १८ जिल्ह्यांमध्ये मधील गृह विलगीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये विलगीकरण कक्ष नसल्यामुळे अनेक बाधित रुग्ण गृह विलगीकरणात राहात होते. यामुळे अनेक कुटुंबातील बाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात दररोज अडीच हजारापेक्षा जास्त नव्याने रुग्ण निष्पन्न होत आहेत, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. गृह विलगीकरणातील काही रुग्ण रस्त्यावर फिरत असल्यामुळे संक्रमण वाढतच होते. पोलीस प्रशासनाने मंगळवारी सातारा शहरात कडक धोरण राबविले. यामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या ११५ नागरिकांची तपासणी केली असता त्यामध्ये १५ जण बाधित आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाने शासनाच्या आदेशाप्रमाणे गृह विलगीकरण आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शहरातील वॉर्डात व पालिकेने व ग्रामपंचायती,सामाजिक संस्थांनी केलेल्या विलगीकरण कक्षात यापुढे करोना बाधित रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे तेथे त्यांच्यावर उपचारापासून सर्व सोय शासन करणार आहे.