चोवीस तासांत 8,488 नवे कोरोना रुग्ण, एकट्या केरळमध्ये 5,080 रुग्णांची नोंद
![8,488 new corona patients in 24 hours, 5,080 patients in Kerala alone](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/383720-corona-logo-3.jpg)
पुणे | भारतात कोरोना संसर्गाचा विळखा सैल होताना दिसत असून, गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 488 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 5 हजार 080 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 1 लाख 18 हजार 443 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 534 दिवासांतील ही नीचांकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 18 हजार 901 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 12 हजार 510 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.31 टक्के एवढा झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 65 हजार 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.25 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 7.83 लाख नमुने तपासले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 116.87 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.