योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यादवांना आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/yogi-adityanath-1.jpg)
सहारनपूर : उत्तरप्रदेशच्या कैराना लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार चालविला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अखिलेश यादव यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सहारनपूरमध्ये प्रचार करून दाखवावा, त्यांचे हात मुजफ्फरनगर दंगलीच्या रक्ताने माखलेले असल्याचे योगींनी म्हटले.
पश्चिम उत्तरप्रदेशबद्दल अखिलेश अफवा पसरवू शकतात, परंतु विकासकामांबद्दल विश्वास निर्माण करू शकत नाहीत. अगोदर येथून लोकांचे पलायन व्हायचे, परंतु आता येथे पलायन नव्हे तर गुंतवणूक होणार असल्याचे योगी म्हणाले.
विकासाला कोणताही पर्याय नसतो, मागील सरकारांनी जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली होती. जातीयवाद, धर्म आणि तुष्टीकरणाचे राजकारण आता भाजपला रोखू शकत नाही. कैरानात विकासाच्या धोरणाचा विजय होईल, असे विधान योगींनी केले.