मुंबईवर मलेरियाचे संकट, गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ
मुंबई: कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरियाचं संकट वाढताना दिसत आहे. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत एकट्या ऑगस्ट महिन्यात 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झालेली आहे. तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. मुंबईत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 824 रुग्ण आढळलेले होते. मात्र यंदा ऑगस्टमध्ये तब्बल 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झालेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणलेले आहेत.
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे पावसाळी आजारांचाही धोका वाढत चालला आहे. दरम्यान गेल्यावर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रुग्ण सापडलेले होते. यंदाही संख्या दुप्पट झालेली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यू रुग्णांची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेने कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 134 रुग्ण होते. आता डेंग्यूचे केवळ 10 रुग्ण आहेत. त्याशिवाय मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्णही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये 623 रुग्ण होते. यंदा ऑगस्टमध्ये फक्त 53 केसेस आहेत.