सत्ताधारी भाजपचा भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा घाट
- प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देणार
- निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सुरुवात
- क्रिसिलकडून मागविला प्रस्ताव
- “वायसीएम’मधील ताण कमी होणार
पिंपरी (विकास शिंदे) – महापालिकेने भोसरी येथे नवीन शंभर बेडचे रुग्णालय बांधले आहे. ते रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास दिले जाणार आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय विभागाने क्रिसिल संस्थेकडून तसा प्रस्ताव तयार करुन अहवाल मागितला आहे. त्याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात होणार असून हे रुग्णालय प्रायोगिक तत्वावर चालविले जाणार आहे. ते रुग्णालय यशस्वी चालल्यानंतर महापालिकेचे वायसीएम रुग्णालय देखील खासगीकरण घाट घातला आहे.
भोसरी येथील शंभर खाटांचे सुसज्ज रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या काही महिनाभरात भोसरी रुग्णालय खुले होणार आहे. जुलैपर्यंत सर्व कामे करुन वैद्यकीय विभागाकडे महापालिका सुपूर्त करणार आहे. शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. सुमारे 25 कोटींची कामे पूर्ण झाले आहेत. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर पिंपरीतील “वायसीएम’ रुग्णालयाचा ताण कमी होणार आहे. सुमारे शंभर खाटांचे रुग्णालय असून, स्त्री-रोग प्रसूती, बालरोग विभाग या विभागाची तेथे सोय नसणार आहे. तर मेडिसीन, नेत्ररोग, अस्थिरोग हे विभाग कार्यरत राहणार आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. भोसरीच्या जुन्या रुग्णालयात दिवसाकाठी चारशे रुग्ण उपचारास येत आहेत. या रुग्णालयात मोशी, आळंदी, चिखली व भोसरी परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्या रुग्णालयावर ताण पडत असल्याने नवीन अद्यावयात रुग्णालय बांधण्यात येणार आहे.
भोसरी रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणार आहे. त्या रुग्णालयात पालिका हद्दीतील केशरी, पिवळी शिधापत्रिका धारक नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे. तर पांढरे कार्डधारकांना तसेच हद्दीबाहेरील, पुरावे नसलेल्या व्यक्तींना इंडियन मेडिकल काैन्सिलच्या दरानूसार उपचारावर शुल्क आकारण्यात येणार आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनाही लागू असणार आहे. त्या रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाय व टेक्निकल कर्मचारी हे खासगी संस्थेचे असणार आहेत.
डाॅ. के. अनिल राॅय – आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका