breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

ग्राऊंड रिपोर्ट : आमदार बनसोडे यांचे ‘एक तीर दो निशाण’ अन्‌ राष्ट्रवादीला ‘गर्भीत इशारा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट कार्यालयात भेट : पक्षांतर्गत ‘साईडट्राईक’ केल्याने बनसोडेंची नाराजी?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी विधानसभेतील आमदार अण्णा बनसोडे यांची थेट कार्यालयात जावून भेट घेतली. अनुभवी आणि मातब्बर नेता असतानाही पक्षांतर्गत कुरघोडींमुळे ‘साईडट्राईक’ झालेले बनसोडे यांची ‘दिल-दोस्ती’ राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना गर्भीत इशारा मानला जात आहे.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळापासून आमदार अण्णा बनसोडे व पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये मनभेद आहेत. त्यामुळे अनेकदार बनसोडे नाराज असल्याची चर्चा झाली. मात्र, आपण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ‘कट्टर’ आहोत, हे बनसोडे यांनी कायम सांगीतले. मात्र, अजित पवार यांचा हाच कट्टर समर्थक, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ‘ताईत’ बनला आहे. 

शहरातील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाच्या ‘दारी’ हजेरी लावली. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत सारवासारवही केली. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि आमदार बनसोडे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. तेव्हा देखील अशीच चर्चा झाली होती. मात्र, शहरात भाजपाचे तीन आमदार, शिवसेनेचे एक खासदार असतानाही मुख्यमंत्री विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कार्यालयात भेट देतात. ती केवळ सदिच्छा नव्हे, तर राजकीय दिशा ठरवणारी भेट आहे, असा दावा जाणकारांकडून केला जातो. 

राष्ट्रवादीत मानसन्मान मिळेना? 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीनंतर बनसोडे आणि स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले असून, बनसोडे यांना पक्ष संघटनेतील कार्यक्रमांना मानाने बोलवले जात नाही, असा बनसोडे समर्थकांचा दावा आहे. कारण, बनसोडे यांनी चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि स्व. लक्ष्मण जगताप यांच्या आदरांजली द्यावी, अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला पक्षातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला. आमदार बनसोडे यांना मानसन्मान दिला जात नाही. याबाबत काही समर्थकांनी थेट अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचेही सांगितले जाते. विशेष म्हणजे, बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घेतलेल्या अनेक आक्रमक भूमिकांबाबत शहर राष्ट्रवादीकडून कोणताही पाठिंबा दर्शवला जात नाही. एखाद्या मुद्यावर बनसोडे यांनी आवाज उठवला, तर त्या मुद्यावर स्थानिक पदाधिकारी उदासीन भूमिका घेतात. महत्त्वाचे म्हणजे, भाजपातील नाराज नगरसेविकेला पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी पक्षातील एक गट कार्यरत आहे. यामुळेच बनसोडे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मनभेद’  झाले आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

 राष्ट्रवादीला इशारा अन्‌ भाजपा ‘चेकमेट’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासून आमदार बनसोडे यांनी दोनदा जाहीरपणे त्यांची भेट घेतली आणि एकत्रित चर्चाही केली. याउलट, अजित पवार ज्यावेळी भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा होती. त्यावेळीही ‘‘अजितदादा जो निर्णय घेतील, त्यांच्या सोबत असेन…’’ असा दावा जाहीरपणे बनसोडे यांनी केला होता.  त्यामुळे बनसोडे यांना राष्ट्रवादीशी फार जिव्हाळा आहे, असे दिसत नाही. दुसरीकडे, आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक प्रमुखपदी अमित गोरखे यांची निवड करुन मतदार संघावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर चिंचवड आणि भोसरी मतदार संघात विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे शहरातील एकतरी मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला सोडावा लागणार आहे. मग, जागावाटपात शिंदे गटाला पिंपरीची जागा सोडली, तर बनसोडे शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार असू शकतील आणि भाजपाला ‘महायुती’चा धर्म पाळावा लागेल. आता राष्ट्रवादी आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आव्हान दिलेच, तर आपल्यासाठी शिवसेना (शिंदे गटाची) दारे खुली आहेत आणि तर दुसरीकडे भाजपा+ शिवसेना महायुतीची ‘ऑफर’ मिळू शकते, अशी ‘एक तीर दोन निशाण’ रणनिती आमदार बनसोडे यांनी आखली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button