breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम की, पराभवाची मानसिकता?

  • जगताप घराण्यातील उमेदवार फोडण्याचा डाव फसला?
  • चिंचवड पोटनिवडणुकीच्या तयारीचा अद्याप ‘सूर जुळेना’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाशी टक्कर देण्याची पूर्ण क्षमता असतानाही केवळ निर्णय क्षमतेअभावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीची घोषणा होताच ‘‘आम्ही तयारीत आहोत’’, असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीकडे कोणताही ठोस ‘ॲक्शन प्लॅन’ दिसत नाही. किंबहुना, भाजपाच्या निर्णयावर अवलंबून राहणे म्हणजे संभ्रम किंवा पराभवाची मानसिकता अधोरेखित करते.

पोटनिवडणूक होणार की बिनविरोध होणार याचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय भारतीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी बैठक होणार आहे. त्यामध्ये हा निर्णय होईल. तत्पूर्वीच, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक लढवावी आणि त्यासाठी राष्ट्रवादीचाच उमेदवार द्यावा, असा ठराव सुरूवातीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवला. त्यानंतर दोन-तीन दिवस प्रदेशाकडून काहीच सूचना आल्या नाहीत. 

दरम्यान,  भाजपाने जगताप कुटुंबियांप्रति सहानुभूती म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आवई उठवली. त्यामुळे राष्ट्रवादीची काहीशी अडचण होत आहे. निवडणूक लढवली, तर सहानुभूतीच्या विरोधाचा सामना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला करावा लागणार आहे. निवडणूक नाही झाली, तरी इच्छुकांचा भ्रमनिरास होणार आहे. दुसरीकडे, नाना काटे, भाउसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे अशी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे संभाव्य बंडखोरीचाही सामना करावा लागणार आहे. 

दुसरीकडे, भाजपाला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला एकत्रित लढावे लागणार, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढायची, याचा संभ्रम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च निर्माण केला. वास्तविक, ही निवडणूक ‘‘घड्याळ चिन्हावरच लढवा’’, असा दावा ज्याअर्थी केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये उमेदवारीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार वेगळा विचार करु शकतात, अशी भिती होती. इथेच राष्ट्रवादीचा ‘सेल्फ गोल’ झाला.

ग्राऊंड रिपोर्टनुसार,  भाजपा विरुद्ध राहुल कलाटे असा सामना झाला पाहिजे. त्यासाठी कलाटे यांनी २०१९ प्रमाणे अपक्ष रिंगणात उतरावे. त्याला महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकमताने पाठिंबा द्यावा, असा ‘अंडर करंट’ आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या तीव्र इच्छुकांसाठी ‘इगो’चा विषय ठरला आहे. त्यामुळे नवा प्रयोग करण्याची रणनिती आखण्यात आली. याउलट, राहुल कलाटे यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला, पण नंतरच्या काळात सावध भूमिका घेतली, असा नाराजीचा सूर राष्ट्रवादीच्या एका गटात मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे मयूर कलाटे यांचा पत्ता बाहेर काढण्यात आला. परिणामी, निवडणूक झालीच, तर त्रिशंकू होणार असून, यात भाजपाचा फायदा होणार आहे.

काय होता नवा प्रयोग? 

भाजपा सहानुभूतीचे ‘शस्त्र’ वापरुन निवडणूक बिनविरोध खिशात घालण्याच्या तयारीत आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीतील काही स्थानिक धुरंधरांनी जगताप घराण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शंकर जगताप आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप असे दोन गट भासवण्यात आले. त्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले. अश्विनी जगताप या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, अशी अफवा उठवून भाजपाची अस्वस्थता वाढवण्यात आली. किंबहुना, अश्विनी जगताप यांच्या संपर्क करुन ‘‘आता नाही, तर कधी नाही’’ असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जगताप कुटुंबातील व्यक्ती राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवायचा आणि भाजपा धक्का देण्याचा हा प्रयोग होता. पण, फसला. जगताप कुटुंबियांनी भाजपा निष्ठा कायम ठेवली. गेल्या आठ-दहा दिवसांत भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील दिग्गज नेते जगताप कुटुंबीयांच्या थेट संपर्कात आहेत. त्यामुळे अश्विनी जगताप राष्ट्रवादीच्या उमेदवार होतील, याची सूतराम शक्यता नाही. ही बाब लक्षात येण्यासाठी राष्ट्रवादीने चार-पाच दिवसांचा निर्णायक वेळ गमावला. महाविकास आघाडीची अद्याप एकही बैठक झाली नाही. आता अर्ज भरण्याचा दिवस उजाडला, तरी निर्णय होत नाही. हे राष्ट्रवादीच्या शहर आणि राज्यातील नेतृत्वाचे अपयश आहे.

तळ्यात मळ्यात भूमिका नुकसानकारक…

निवडणूक बिनविरोध होणार, या विचाराने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गेले चार दिवस गाफील राहिले. पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. त्यामुळे अखेर चिंचवड विधानसभा निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके यांची ‘एन्ट्री’ झाली. त्यांनी पहिल्या झटक्यात निर्णय घेतला. ‘‘ही निवडणूक राष्ट्रवादी लढवणार आहे आणि बिनविरोध करायचीच असेल, तर जगताप कुटुंबातील व्यक्तीने भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर उमेदवारी घेवू नये, आम्ही निवडणूक बिनविरोध करु’’ असे जाहीरपणे सांगितले. याद्वारे यामुळे राष्ट्रवादीत अद्याप ठोस निर्णयच झालेला नाही, हे स्पष्ट होते. तसेच, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या टीका करीत ‘बारणे विरुद्ध राष्ट्रवादी’ अशा संघर्षालाही शेळके यांनी फुंकर घातली. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधी बारणे गट एकवटला आहे. बारणे आणि जगताप यांची ताकद निश्चितच चिंचवड मतदार संघात सर्वाधिक आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी नाही. याउलट, राष्ट्रवादीने मावळचे आमदार सुनील शेळके यांना ‘ॲक्टीव्ह’ करावे लागले. वास्तविक, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिकांना एखादे नेतृत्व लादले, तर ‘नकारात्मक प्रतिक्रिया’ उमटतात. एकीकडे भाजपाला जोमाने कामाला लागली असताना, राष्ट्रवादीची तळ्यातमळ्यात भूमिका नुकसानकारी ठरणार आहे. याचा विचार शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी करावा, कारण यश  किंवा अपयशाचे धनी तेच ठरणार असून, याचा परिणाम आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भोगावा लागणार आहे.

    Job AlertJob Alert Job Alert Job Alert

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button