breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध; शिरूर लोकसभा मैदानासाठी चाचपणी?

– २०१९ मधील अधुरी मनोकामना पूर्ण करण्याची आतापासूनच तयारी

– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीमुळे भोसरीत राजकीय समीकरणे बदलणार

पिंपरी | अधिक दिवे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांची भोसरी विधानसभेचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी नुकतीच भेट घेतली. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना सोबत घेऊन मोठ्या पवारांकडे एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले. शहरातील केंद्र सरकारशी निगडीत प्रलंबित प्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना “बायपास” करीत बारामतीत धडक दिली. त्यामुळे लांडे यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर “मास लीडर” म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार लांडे आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील आमदार बनसोडे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

शहरातील संरक्षण विभागातील रस्ते, रेड झोन, पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण, प्रलंबित विकासकामे याबाबत चर्चा केली. बोपखेल ते खडकीला जोडणारा उड्डाणपूल, पिंपरी डेअरी फार्म ते पिंपरीगावचा उड्डाणपूल यासह केंद्र व राज्य शासनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. बेकायदा बांधकामे, शास्तीकर, पिंपरी पालिकेतील भाजपचा भ्रष्ट कारभार, करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी, नागरी प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आदी मुद्द्यांकडे पवारांचे लक्ष घेतले. तसेच, शरद पवार यांनी आता शहरात लक्ष घालावे, अशी विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शरद पवार आता शहराला वेळ देणार आहेत, असेही सांगण्यात आले.

भोसरी विधानसभा मतदार संघाचा शिरूर लोकसभा मतदार संघात समावेश आहे. २००९ मध्ये माजी आमदार लांडे यांनी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी आढळराव पाटील यांना ४ लाख ८२ हजार ५६३ मते मिळाली होती. तर ३ लाख ३ हजार ९५२ मते घेऊन लांडे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी लांडे यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. लांडे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. पण, ऐनवेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या आखाड्यात ‘एन्ट्री’ केली. त्यामुळे लांडे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. मात्र, राजकारणातील मुरब्बी असलेले लांडे पुन्हा ‘फिनिक्स भरारी’ घेण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत नगरसेवक, महापौर आणि विधानसभेत आमदार म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर आता लांडे यांना संसदेत पिंपरी- चिंचवडचा आवाज घुमावण्याची महत्वाकांक्षा आहे. २००९ पासून अपूर्ण असलेली मनोकामना २०२४ मध्ये पूर्ण करण्यासाठी लांडे कामाला लागले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. कोल्हेवर भरोसा नाही का?

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचा ‘कणा’ शरद पवार आहेत. असे असले तरी पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीशिवाय पानही हालत नाही. तरीही पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न घेऊन लांडे आणि बनसोडे शरद पवारांच्या भेटीला गेले. दुसरीकडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वेळोवेळी पिंपरी-चिंचवड शहरात भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय मार्गी लावून घेतला. असे असतानाही प्रलंबित प्रश्न शरद पवार यांच्याकडे मांडण्यात आले. शहरात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे लांडे आणि बनसोडे जोडीचा अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर भरोसा नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button