Uncategorized

नोकरी देण्याचे आमिष दाखवत परराज्यातील तरुणीचा पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीकडून विनयभंग

पिंपरीः

नोकरीसाठी पश्चिम बंगाल येथून आलेल्या तरूणीचा विनयभंग करून, तिच्यावर अत्याचार करण्यासाठी अन्य तीन आरोपींकडे सोपवल्याच्या आरोपांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापती अर्जुन ठाकरे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित होत्या. सध्या ठाकरे पती-पत्नी भाजपमध्ये आहेत.

सध्या वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे राहणाऱ्या आणि मूळच्या पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे याच्यासह महेश्वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आदींवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकाराला सुरूवात पुणे लष्कर परिसरात झाल्याने तपासासाठी हे प्रकरण लष्कर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

संबंधित तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, ती नोकरीच्या शोधात होती. तेव्हा ‘नोकरी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर तरुणीला एका महिलेचा नंबर मिळाला. त्या महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगत पुण्यात बोलवले. नंतर बँकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. संबंधित तरुणीने ठाकरेशी संपर्क केल्यावर तिला लोकेशन पाठवून पुणे लष्कर परिसरातील एका कंपनीत बोलवण्यात आले. तेथे ठाकरेने स्वत:ची तसेच चिरागउद्दीन शेख, त्याची पत्नी आणि महेश्वरी रेड्डी या तिघांची ओळख करून दिली. तरुणीची ओळख करून देताना ठाकरेने विनयभंग केल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महेश्वरी रेड्डी याने संबंधित तरुणीची मुलाखत घेतल्यानंतर ठाकरेला रेड्डी याने १५ हजार रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित तरुणीला तिची शैक्षणिक आणि अन्य आवश्यक कागदपत्र घेऊन कंपनी कार्यालयात बोलावण्यात आले. संबंधित तरुणी कार्यालयात गेल्यानंतर चिरागउद्दीन शेखची पत्नी तिला तिच्या कामाचे स्वरूप समाजावून सांगत असताना, रेड्डीने तेथे येऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी रेड्डीने वारंवार पुणे येथील कार्यालयात वेळोवेळी तिचा विनयभंग केला. १५ दिवस हा प्रकार झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडला नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत पिंपरीतील जयगणेश वरदहस्त या इमारतीत बोलावून तेथे तिचा विनयभंग केला. मे महिन्यात हा सर्व प्रकार घडला असल्याचे तरूणीचे म्हणणे आहे.

त्यानंतर ३ जून रोजी एकदा कार्यालयातील स्वच्छतागृहात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पीडित तरुणी निघून जाऊ लागली असता महिला आरोपीने तिला अडवले. आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे सांगितले. त्यानंतर चिरागउद्दीनने तिला पॉर्न व्हीडीओ दाखवला तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. आम्ही अनेक मुलींना परदेशात विकले आहे. आमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. रेड्डी जे सांगतोय ते कर, नाहीतर तुझ्यासह घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी दिली. नोकरीची गरज असल्याने आत्तापर्यंत याबाबत तक्रार केली नसल्याचे सांगत अर्जून ठाकरेने केवळ १५ हजार रुपयांसाठी माझी विक्री केल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी रेड्डीने तरुणीला व्हीडीओ कॉल करून अश्लील हावभाव केले. बऱ्याच वेळा हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणीने तिच्या ओळखीच्या महेशनगर, नेहरूनगर-अजमेरा येथील काही तरुणांशी चर्चा केल्यानंतर तिने पिंपरी पोलिसांकडे जाऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठाकरे यांच्यासह चौघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पुणे शहर पोलिसांच्या लष्कर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अर्जुन ठाकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी गुन्हा दाखल झाला त्यानंतरही पालखी वारी सोहळ्यात होतो. मला याबाबत आजच समजले आहे. मी किंवा आमच्यापैकी कुणीही कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ठाकरे यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button