breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा जपण्याचे काम सर्वांनी करावे: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारवनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व परीविक्षाधिन पोलीस अधिकारी तेजबिर सिंह संधू यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गजानन देशमुख आणि आशा स्वामी यांना जिल्हास्तरीय प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. नेहरु युवा केंद्रातर्फे शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाऊंडेशनचे डॉ.बच्चुसिंग टाक यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात येणारे जिल्हास्तरीय पुरस्कार रोबोलॅब टेक्नोलॉजीच्या अमोल गुल्हाणे आणि अनंत इंडस्ट्रिजच्या चेतन धारीया यांना प्रदान करण्यात आला.

उपवनसंरक्षक पुणे विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वनपाल प्रकाश चौधरी आणि एम.एस.शिरसाठी यांना  तर कामगार आयुक्तालय मुंबईतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार ज्ञानेश्वर हिवराळे आणि रुपाली वाघ यांना प्रदान करण्यात आला. सहा.पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सहायक पोलीस फौजदार धनंजय कदम यांना केंद्रीय गृहमंत्री पदक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक बळीराम पोळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि हेड कॉन्स्टेबल महोम्मद मोमिन यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा जपण्याचे काम सर्वांनी करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याचे प्रयत्न करताना महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे कार्य केले. यापुढच्या काळातही राज्याचा सुसंस्कृत चेहरा जपण्याचे कार्य सर्वांनी मिळून करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

ते म्हणाले, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे रहायला हवा. पायाभूत सुविधांची उभारणी करताना सामाजिक सुधारणांनाही महत्व देण्यात येत आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचे स्व.यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा  शासनाचा प्रयत्न आहे.

विकासासाठी राज्य शासन दृढसंकल्प

राज्य व पुण्याच्या विकासासाठी राज्य शासन दृढसंकल्प आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात त्यादृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पातूनही राज्याच्या विकासाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जुन्नर तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. पेरणे फाटा येथील जयस्तंभ परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. अष्टविनायक परिसर विकासासोबत प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन अंतर्गत एकवीरा देवी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे; राजगड, तोरणा, शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त ‘इंद्रायणी मेडिसीटी’ नावाने भव्य वैद्यकीय वसाहत स्थापन करण्यात येत आहे. नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वेच्या 16 हजार 39 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूसंपादन सुरु आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे सुरू झाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविले जातील आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री म्हणाले, पुणे शहर परिसरातील अंतर्गत व बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक 3 हजार 893 कोटी पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

पुणे‍ जिल्हा परिषदेने  2021-22 मध्ये विविध विकासकामांसाठी 1 हजार कोटी रुपये खर्च करत देशात सर्वाधिक खर्च करण्यासोबत गतवर्षी 15 हजार कामे पूर्ण केल्याने श्री.पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापनदिन साजरा करताना बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक गावे अजूनही महाराष्ट्रात सामील होऊ शकली नाहीत, याची खंत व्यक्त करीत  सीमाभागातल्या मराठी भाषक बांधवांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठीच्या लढ्याला, महाराष्ट्र राज्याचा, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button