breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी उभारणा स्वतंत्र यंत्रणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची सकारात्मकता

सोसायटी प्रतिनिधी आणि वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सोसायट्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभाराव्यात, असा सूर सोसायटी प्रतिनिधींना काढला आहे. त्याचा सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांच्यासह सर्वांनाच फायदा होईल. या बाबत सकारात्मक विचार करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय विभागाला दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांचे प्रतिनिधी, शहरातील सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गृहनिर्माण संस्थांतील सभासदांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचाव्यात यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय विभागाकडून हे आश्वासन देण्यात आले होते.

या बैठकीला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, चिखली-मोशी- चर्‍होली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, रावेत पुनावळे फेडरेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रावार, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रवक्ता अरुण देशमुख, पिंपरी चिंचवड फेडरेशनचे सचिन लोंढे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यात ‘हा’ आजार पसरतोय वेगाने; जाणून घ्या लक्षणं आणि उपाययोजना

या बैठकीमध्ये शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांपर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर सोसायटीच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सोयी सुविधा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांपर्यंत पोचविल्या जातात. आशा वर्कर, वैद्यकीय विभागाचे एएनएम, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी आदी यंत्रणा त्यासाठी काम करत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे साथीचे आजार, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होत आहे.

मात्र पिंपरी चिंचवड शहरातील शहरी भागांमध्ये असणार्‍या सहकारी गृहनिर्माण संस्थेत महापालिकेच्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचे गार्‍हाणे सोसायटीच्या प्रतिनिधींनी मांडले. उच्चभ्रू सोसायटीमधील लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या पर्यंत वैद्यकीय मदत लवकरच पोचण्याची व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका स्तरावर एक स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्या यंत्रणेद्वारे सोसायटीधारकांना वैद्यकीय योजनांचा लाभ देता येईल, असे मत सोसायटीच्या प्रतिनिधींनी मांडले.

या बाबत वैद्यकीय विभागाकडून सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती चिखली-मोशी- चर्‍होली -पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी वतीने देण्यात आली.

कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने योग्य उपाययोजना करत शहरातील नागरिकांची काळजी घेतली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. सध्याही वैद्यकीय सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत फेडरेशनच्या माध्यमातून देखील केली जाईल. सोसायटीमध्ये सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक मदतीसाठी आम्ही एक पाऊल पुढे येऊ. शहरातील महापालिका रुग्णालयात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेनुसार बेड आरक्षित ठेऊ नये. तर ज्यांना आवश्यकता आहे. अशा गरजू व्यक्तींना त्वरीत उपचार मिळावेत, यासाठी बेड आरक्षित करणे गरजेचे आहे.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी- चर्‍होली -पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button