थिएटरपेक्षा लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेब सीरिज पाहण्यास पसंती
राणी मुखर्जीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये काही चित्रपट जुने असून पुन्हा ते ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते टॉपमध्ये ट्रेंड करत आहेत. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो जुना चित्रपट असून अचानक पुन्हा चर्चेत आला आहे.
सध्या नेटफ्लिक्सवर जुना पण तितकाच प्रभावी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 2014 मध्ये थिएटरमध्ये प्रेक्षकांना हादरवून सोडणारा राणी मुखर्जीचा कल्ट क्लासिक चित्रपट ‘मर्दानी’ पुन्हा एकदा ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला थरारक, वास्तववादी आणि मन सुन्न करणारी कथा पाहायची असेल तर अवघ्या 113 मिनिटांचा हा डार्क थ्रिलर चित्रपट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
समाजाच्या कटू वास्तवावर बोट ठेवणारी कथा
‘मर्दानी’ चित्रपट हा केवळ पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील पाठलागाची गोष्ट नाही तर समाजातील अशा भीषण वास्तवाला समोर आणतो ज्याकडे आपण सहसा बघत नाही. चित्रपटाची कथा मुंबई क्राइम ब्रँचमधील निर्भीड पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय म्हणजेच राणी मुखर्जी हिच्या भोवती फिरते. शिवानी ही अशी अधिकारी आहे जी घाबरत नाही तर गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करते.
हेही वाचा : अॅड. अनुजा पाटील यांचा सेवाभावी उपक्रम; अथर्वाचा वाढदिवस दृष्टिहीन मुलींमध्ये साजरा
कथेला खरा वेग येतो तो म्हणजे जेव्हा शिवानीच्या जवळ राहणारी एक अनाथ मुलगी अचानक गायब होते. तिचा शोध घेताना शिवानीचा सामना मानव तस्करीच्या एका भयानक आणि वेगळ्या जगाशी होतो. दिल्लीपासून मुंबईपर्यंत पसरलेल्या या काळ्या साम्राज्याचे धक्कादायक सत्य हळूहळू उघड होत जाते.
राणी मुखर्जीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट
‘मर्दानी’ हा चित्रपट राणी मुखर्जीच्या करिअरमधील एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. तिचा या चित्रपटातील अभिनय आजही तितकाच प्रभावी वाटतो. त्याचबरोबर, ताहिर राज भसीनने या चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच भूमिकेतून एक शांत पण अत्यंत भयावह खलनायक कसा असू शकतो हे दाखवून दिले.
प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘मर्दानी’ला IMDb वर 7.3 रेटिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे, सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. जवळपास दशकभर जुना असूनही या चित्रपटाची कथा, मांडणी आणि अभिनय आजच्या प्रेक्षकांनाही तितकाच अस्वस्थ करतो.




