अॅड. अनुजा पाटील यांचा सेवाभावी उपक्रम; अथर्वाचा वाढदिवस दृष्टिहीन मुलींमध्ये साजरा
शिक्षण विश्व : वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश

पुणे | कोथरूड येथील द पूना गर्ल्स ब्लाइंड स्कूल येथे अॅड. अनुजा पाटील यांनी आपल्या सुपुत्र चि. अथर्व याच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. वाढदिवस केवळ औपचारिक साजरा न करता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेच्या आदरणीय प्राचार्या रंका मॅडम, प्रशासकीय अधिकारी श्री. अमितजी, सामाजिक कार्यकर्त्या सविताजी, शाळेतील कर्मचारीवर्ग तसेच दृष्टिहीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करून कार्यक्रमास आपुलकीची व सन्मानाची किनार दिली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४०.५ टक्के मतदान
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी नेत्रा, हिंदवी व कांचन यांनी सादर केलेल्या सुरेल व भावपूर्ण गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून कला, जिद्द व आत्मशक्तीचे दर्शन घडले आणि संपूर्ण वातावरण आनंदी व प्रेरणादायी झाले.
यानंतर अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींसाठी आवश्यक अन्नधान्य व दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मदतीपुरता मर्यादित न राहता माणुसकी, संवेदनशीलता व सामाजिक जबाबदारीचे जिवंत उदाहरण ठरला.
निरागस हास्य व आनंदाने उपस्थितांचे मन भारावून गेले..
चि. अथर्वचा वाढदिवस दृष्टिहीन मुलींमध्ये साजरा होताना त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य व आनंदाने उपस्थितांचे मन भारावून गेले. सेवाभावातून साजरा झालेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या वतीने अॅड. अनुजा पाटील व अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. समाजातील दुर्बल घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




