तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्रीचं ‘अबीर गुलाल’मधून पुनरागमन
‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘अबीर गुलाल’! नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित!
![The actress from Tula Pahete Re is making a comeback with 'Abeer Gulal'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Abir-gulal-780x470.jpg)
मुंबईः मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेडपदी नियुक्ती झाल्यावर अनेक नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या दोन मालिकांशिवाय ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा नवाकोरा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. याचबरोबर आता येत्या काळात आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा वाहिनीकडून करण्यात आली आहे. ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ अशा दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या मालिका सुरू झाल्यावर कलर्स मराठी वाहिनीवरच्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘अबीर गुलाल’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “दोन अनोळखी मुलींचं नशीब बदलणारी ती रात्र” यावर आधारित या मालिकेचं कथानक असणार आहे. पहिल्या टीझरमध्ये केवळ दोन तान्ह्या बाळांची झलक पाहायला मिळाली होती. परंतु, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये मालिकेत कोणत्या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार याचा उलगडा झाला आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून गायत्री दातार हा नवा चेहरा घराघरांत लोकप्रिय झाला. ही मालिका प्रचंड गाजली होती. आता अनेक वर्षांनी गायत्री पुन्हा एकदा मराठी कलाविश्वाच्या छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करायला सज्ज झाली आहे. ती साकारत असलेल्या पात्राचं नावं शुभ्रा असल्याचं प्रोमोमधून समोर आलं आहे. तर, गायत्रीच्या जोडीला या मालिकेत ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री पायल जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पहिल्याच प्रोमोमध्ये पायलचं पात्र काहीसं समजूतदार वाटत आहे. तर, गायत्री दातार प्रोमोमध्ये “शुभ्रा हेट्स ब्लॅक…” असं बोलताना दिसत आहे.