ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ची महाविजेती ठरली गीत बागडे

पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. विरार इथली जुई चव्हाण, पलाक्षी दीक्षित, पुणे इथला देवांश भाटे, स्वरा किंबहुने, यवतमाळची गीत बागडे आणि संगमनेरच्या सारंग भालके या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके. विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ची विजेती गीत बागडेला पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली, हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिलं. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून 6 सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठली. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 9 आणि 10 नोव्हेंबरला प्रसारित झाला.

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button