‘चंद्रपूरच्या जंगलात’ नाटकामुळे कलाकार झालो; सुबोध भावे
![Subodh Bhave said that he became an artist because of the drama in the forest of Chandrapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/subodh-bhave-780x470.jpg)
‘बालगंधर्व’ आणि ‘लोकमान्य’ हे चित्रपट करु शकतो असं वाटले नव्हतं
पिंपरी : रंगमंचावर अथवा चित्रपटात काम करण्याची प्रेरणा, किंवा कलाकार म्हणून घडवण्यात ” चंद्रपूरच्या जंगलात” या नाटकाचा महत्वपूर्ण असा वाटा आहे, असे नाटय चित्रपट अभिनेता सुबोध भावे यांनी विशेष मुलाखतीमध्ये सांगितले. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी भावे यांना बोलते केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रात “माझा चित्रप्रवास”हा भावे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगतदार झाला.
सुमारे दिड तास रंगतदार झालेल्या या कार्यक्रमात भावे यांनी ” बालगंधर्व ” आणि ”लोकमान्य” चित्रपट निर्मितीचा प्रवास कथन केला. खरे तर नाटकामध्ये काम करीन असे कधी वाटले नव्हते असे नमूद करून ते म्हणाले, नूतन मराठी विद्यालयात शिकलो. या शाळेतून अनेक कलाकारांची जडण घडण झाली आहे. पण अनेकदा भरत नाट्य मंदिर परिसरात असायचो. त्यावेळी पडद्यामागे काम करावे असे जाणवत होते. कारण अभिनय क्षेत्राशी कोणताही संबंध नव्हता. त्यानंतर ‘पुरुषोत्तम’ साठी ‘चंद्रपूरच्या जंगलात’ या नाटकाचा प्रयोग केला. या प्रयोगाने मला या क्षेत्राकडे गांभीर्याने पहायला शिकविले. यातून अनेक बाबी शिकता आल्या. आज मी जो आहे त्यामागे हे नाटक आहे असे मला प्रामाणिक पणाने वाटते. त्यानंतर विविध लेखकांच्या भाषांचा अभ्यास केला. ती अवगत करण्याचा प्रयत्न केला. शब्द आणि त्यामागचा भाव हा रसिकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाही नकळत संस्कार झाला, असं सुबोध भावे म्हणाले.
‘बालगंधर्व’ आणि ‘लोकमान्य’ हे चित्रपट करु शकु असे वाटले नव्हते. कारण हे अवघड आव्हान होते. त्यांच्या भूमिका साकारणे अशक्य होते तरी ते शक्य करता आले याचे समाधान आहे. या दोन्ही भूमिकेत स्वतःला प्रामाणिक पणाने पाहण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी अभ्यास केला, पुस्तके वाचली आणि तसे करण्याचा प्रयत्न केला त्याला रसिकांनी देखील मनस्वी प्रतिसाद दिला, असं सुबोध भावे म्हणाले.
यावेळी भावे यांनी नव्याने प्रदर्शित होणारा ‘वाळवी’ या चित्रपटाबाबत माहिती सांगितली. मुलाखतीचा समारोप त्यांनी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या ” लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी.” या कवितेने केला.