अभिनेता अल्लू अर्जुनच्या तेलंगणातील घरावर दगडफेक, आठ जण ताब्यात
Allu Arjun | हैदराबाद येथील एका सिनेमागृहात पुष्पा २ अर्थात पुष्पा द रुल या सिनेमाचा प्रीमियर ४ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण हैदराबाद या ठिकाणी असलेल्या अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे आणि घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी काही आंदोलक हे अल्लू अर्जुनच्या घरात घुसले आणि त्याच्या घराची तोडफोडही केली. तसंच अल्लू अर्जुनच्या घरावर टॉमेटो फेकले. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये द्यावेत, शिवाय शक्य आहे तेवढी सगळी मदत करावी अशा दोन मागण्या या सगळ्या सदस्यांनी केल्या. या प्रकरणात आठ सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा – राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले..
हैदराबाद येथील जुबिली हिल भागात अल्लू अर्जुनचं घर आहे. त्या ठिकाणी ही घटना घडली. ज्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घातलं आणि या सगळ्यांना पोलीस ठाण्यात नेलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन घरात नव्हता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे सगळे आंदोलक खूप संतापले होते असं पोलिसांनी म्हटलं आहे.